इस्रायलच्या पोर्टसाठीची बोली अदानी ग्रुपने जिंकली

देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी समूहाने भागीदार गॅडोट सह इस्रायलच्या हाईफा पोर्टच्या खासगीकरणाची बोली जिंकली आहे. रॉयटरच्या बातमीप्रमाणे या पोर्ट मध्ये अदानी समूहाची भागीदारी ७० टक्के तर गॅडोट या इस्रायलच्या बड्या केमिकल आणि लॉजीस्टिक ग्रुपची भागीदारी ३० टक्के आहे. मेडीटेरीनियन कोस्टवर असलेले हायफा पोर्ट इस्रायलच्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एक आहे.

गौतम अदानी यांनी गुरुवारी ट्वीट करून बोली जिंकल्याची माहिती दिली आहे. हे पोर्ट दोन्ही देशातील अत्याधुनिक स्ट्रॅटीजी व ऐतिहासिक महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. ४.१ अब्ज शेकेल म्हणजे ९४ अब्ज रुपयांची बोली लावून अडाणी समूहाने हे पोर्ट घेतले आहे. पुढची ३२ वर्षे म्हणजे २०५४ पर्यंत या पोर्टचे संचालन अदानी आणि गॅडोट ग्रुप कडे राहणार आहे.

इस्रायलचे अर्थमंत्री एविग्दोर लिबरमन यांनी इस्रायल नागरिकांसाठी ही चांगली बातमी असल्याचे म्हटले आहे. हायफा पोर्ट खासगीकरणामुळे स्पर्धा वाढेल आणि त्यामुळे त्यावर होणार खर्च कमी होईल असे ते म्हणाले. अशदोड हे इस्रायल मधील सर्वात मोठे पोर्ट आहे मात्र पॅसेंजर ट्रान्सपोर्ट साठी हायफा हेच मुख्य पोर्ट आहे. या पोर्टचा २०२१ मधला महसूल १९२९ कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा ६१९ कोटी रुपये होता असे समजते. अदानी समूहाकडे भारतातील १३ मुख्य पोर्टचे संचालन आहे.