मुंबई टंकसाळीत बनले १७५ रुपये मूल्याचे विशेष नाणे

देशातील आयआयटी रुरकीच्या स्थापनेस १७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक विशेष नाणे मुंबई टंकसाळीत तयार झाले आहे. १७५ रुपये मूल्याचे हे नाणे ३५ ग्राम वजनाचे आहे. त्यात ५० टक्के चांदी,४० टक्के तांबे आणि ५-५ टक्के निकेल आणि जस्त धातूंचे मिश्रण आहे. गोलाकार नाण्याचा साईज ४४ मिमी आहे. या नाण्याच्या मुख्य भागावर भारतीय प्रौद्योगिक संस्थान रूडकी येथील प्रशासकीय इमारतीची प्रतिमा आणि खाली १७५ रुपये लिहिले गेले आहे. मागच्या बाजूस अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयते अशी अक्षरे आहेत.

यापूर्वीही वेळोवेळी अशी विशेष नाणी तयार केली गेली आहेत.सरकारने ६०,७५,१००,१२५,१५०,२५०,३५०,४००,५००,५५० आणि १ हजार  रुपये किमतीची नाणी काढली होती. २०१७ मध्ये तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एमजी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी वर्षात तसेच २०१६ मध्ये महाराणा प्रताप यांच्या ४७६ व्या जयंती निमित्त, स्मारक नाण्यात अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर १०० रुपयांची नाणी काढली गेली होती. सर्वात महाग नाणे १ हजार रुपये मूल्याचे असून ते तामिळनाडू मधील प्राचीन बृह्देश्वर मंदिराला १ हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ काढले गेले होते.

रवींद्रनाथ टागोर, कॅग स्थापना, मोतीलाल नेहरू, मदनमोहन मालवीय, स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती निमित १५० रुपये मूल्याची नाणी काढली गेली आहेत तर जवाहरलाल नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त १२५ रुपये मूल्याची नाणी काढली गेली आहेत. रिझर्व्ह बँक स्थापनेला ७५ वर्षे झाल्यावर ७५ रूपये मूल्याचे विशेष नाणे काढले गेले आहे.