डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रथम पत्नी इवाना यांचे निधन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना यांचे न्यूयॉर्क येथे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. ट्रम्प यांनी ट्वीट करून इवाना यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण दिले गेले नसले तर मिडिया रिपोर्ट नुसार इवाना यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने झाला. डोनाल्ड आणि इवाना यांनी १९९२ मध्ये घटस्फोट घेतला होता.

चेकोस्लोवाकियाच्या कम्युनिस्ट राजवटीत लहानाच्या मोठ्या झालेल्या इवाना यांनी साम्यवाद सोडून अमेरिकेचा स्वीकार केला होता. १९७७ मध्ये त्यांचा डोनाल्ड यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना डोनाल्ड ज्युनिअर, इव्हांका आणि एरिक अशी तीन मुले आहेत. डोनाल्ड आपल्या पत्नी बाबत ट्वीट करताना म्हणतात,’ इवानाच्या निधनाचे दुःख आहे. ती अद्भुत, सुंदर महिला होती आणि प्रेरणादायी आयुष्य जगली. आमच्या मुलांबद्दल तिला अभिमान होता.’

लग्नानंतर इवाना यांनी ट्रम्प परिवाराच्या व्यवसायात मोठी भूमिका निभावली होती. सिंग्नेचर बिल्डींग, न्यू जर्सी व अटलांटा सिटी ट्रम्प ताजमहाल कॅसिनो रिसोर्ट चालविण्यात त्यांचे योगदान मोठे होते. ट्रम्प टॉवर विकासात सुद्धा त्यांची भागीदारी मोठी होती.