भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी T20 संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर केएल राहुलचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे राहुल संघाबाहेर होता.
India T20 Squad for West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 संघातून कोहली बाहेर, रोहित कर्णधार, अश्विन-राहुलचे पुनरागमन
याशिवाय रविचंद्रन अश्विनचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेनंतर अश्विनने एकही टी-20 सामना खेळलेला नाही. भारतीय संघ 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. यादरम्यान संघ तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवन कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
विराटने केली होती स्वतः विश्रांतीची मागणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने स्वतः संपूर्ण वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांतीची मागणी केली आहे आणि यामुळेच तो एकदिवसीय किंवा टी-20 मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही. वेस्ट इंडिज मालिकेतील विश्रांतीनंतर विराट आशिया कपमध्ये भारतीय संघात सामील होऊ शकतो.
बुमराह-चहलला विश्रांती
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने असेही म्हटले आहे की केएल राहुल आणि कुलदीप यादव फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच संघात सामील होतील.
अश्विनला सुंदरपेक्षा दिली पसंती
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की अश्विन हा टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या योजनेचा एक भाग आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार आहे. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदर अजूनही खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. जेव्हा तो तंदुरुस्त असेल, तेव्हा तो रॉयल लंडन कप आणि काउंटी चॅम्पियनशिपमध्ये लँकेशायरकडून खेळेल.
अर्शदीप सिंगचे T20 संघात पुनरागमन
चहलच्या जागी अश्विन आला आहे. याशिवाय झंझावाती गोलंदाज उमरान मलिकलाही संघातून वगळण्यात आले आहे. अर्शदीप सिंगचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. अर्शदीपने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये शानदार गोलंदाजी केली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20साठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. आता कर्णधार रोहितने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
यांच्यावर असेल जबाबदारी
फलंदाजीची जबाबदारी इशान किशन, सूर्यकुमार, दीपक हुडा, श्रेयस, कार्तिक आणि पंत यांच्यावर असेल. त्याचबरोबर जडेजा, अक्षर, अश्विन आणि बिश्नोई यांच्यावर फिरकीपटूंची जबाबदारी असेल. कुलदीप तंदुरुस्त झाल्यास संघात सामील होईल. हार्दिक वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर, आवेश, हर्षल आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.
वनडे मालिकेसाठी देण्यात आली वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
याआधी बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. शिखर धवनकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवींद्र जडेजा वनडे संघाचा उपकर्णधार असेल. त्याच्यावर पहिल्यांदाच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, 22 जुलै
दुसरी वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, 24 जुलै
तिसरी वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, 27 जुलै
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत T20 मालिका वेळापत्रक
पहिला T20I: त्रिनिदाद, 29 जुलै
दुसरा T20: सेंट किट्स, 1 ऑगस्ट
तिसरा T20: सेंट किट्स, 2 ऑगस्ट
चौथी T20: लॉडरहिल, फ्लोरिडा, 6 ऑगस्ट
पाचवी T20: लॉडरहिल, फ्लोरिडा, 7 ऑगस्ट