वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या स्तंभावरील सिंहाबद्दल बोलले शिल्पकार

राष्ट्रीय मानचिन्हावरील सिंहाच्या रूपावरून सुरु असलेल्या वादात शिल्पाच्या निर्माते टीम कडून स्पष्टीकारण दिले गेले आहे. हे शिल्प बनविणाऱ्या टीम मध्ये औरंगाबादचे शिल्पकार सुनील देवरे आणि त्यांचा भाऊ सुशील सामील आहेत. या शिवाय या टीममध्ये राजस्थानचे शिल्पकार लक्ष्मण व्यास यांचाही समावेश आहे. हे सर्व शिल्पकार नावाजलेले आणि जागोजागी अनेक शिल्पे साकारलेले आहेत.

सध्या संसदेच्या नवीन वास्तूवर बसविल्या जात असलेल्या राष्ट्रीय मानचिन्ह अशोक स्तंभावरील सिंह त्यांच्या रूपावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच या मानचिन्हाचे अनावरण झाले तेव्हा त्यावरचे चार सिंह पूर्वीच्या सिंहापेक्षा अधिक उग्र आणि आक्रमक वाटत असल्याची जोरदार टीका विरोधकांच्या कडून केली जात आहे. यावर बोलताना ४९ वर्षीय मराठी शिल्पकार सुनील देवरे म्हणाले, कोणाच्याही दबावाखाली आम्ही हे काम केलेले नाही तर सारनाथ स्तंभाचा पूर्ण अभ्यास करून मगच शिल्प साकारले आहे.

सुनील म्हणाले, मूळ स्तंभावरील सिंहांपेक्षा नवीन मानचिन्हावरील सिंह उग्र दिसत असल्याचे बोलले जात असले तरी ते खरे नाही. हे शिल्प सात मीटर उंचीचे आहे. त्यामुळे पूर्ण आकार आणि डायमेन्शन मुळे सिंह थोडे वेगळे वाटतील. पण मूळ स्तंभावरील सिंह तुम्ही खालच्या बाजूने पहिले तर ते असेच दिसतात. टू डी व्हर्जन मुळे पूर्वीच्या शिल्पात चौथा सिंह सहज दिसत नाही. थ्री डी व्हर्जन मध्ये मात्र तो दोष दूर होतो. मूळ स्तंभांपेक्षा हे शिल्प २० पटीने मोठे आहे आणि ९५०० किलोचे आहे.

सुनील यांचे ग्राफिक डिझायनर भाऊ सुशील म्हणाले,’ नुसत्या डोळ्यांनी पाहिले तर सिंहांच्या तोंडावरचे भाव थोडे वेगळे वाटतील पण वेगळ्या कोनातून पाहिले तर मूळ आणि नवीन सिंहांमध्ये फरक नाही. महाराष्ट्रात अनेक महत्वाची शिल्पे सुनील यांनी तयार केली आहेत त्यात पैठण येथील संत ज्ञानेश्वर यांचा पुतळा सामील आहे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने त्यांच्या टीमची या शिल्पासाठी निवड केली होती. ही कंपनी नवीन संसद उभारण्याचे काम करत असून या वर्षाखेर ते पूर्ण केले जाणार आहे.