असा आहे बार कोड आणि क्यूआर कोड मधील फरक

डिजिटल युगात बार कोड आणि क्युआर कोड शिवाय पान हलत नाही असे म्हटले तर त्यात काही गैर होणार नाही. मात्र अनेकांना बार कोड आणि क्यूआर कोड म्हणजे एकच असे वाटते. अर्थात क्यूआर कोड हे बार कोडचचे आधुनिक व्हर्जन असले तरी त्या दोन्ही मध्ये फरक आहे. बार कोड वर संबंधित उत्पादनाची सर्व माहिती मिळते तर क्यूआर कोड वर या पेक्षा अधिक माहिती मिळते आणि क्यूआर कोड स्कॅन करून त्या वस्तूची किंमत सुद्धा देता येते.

बार कोड व्यावसायिक स्वरुपात १९७४ मध्ये प्रचलित झाले. हे कोड म्हणजे ऑप्टीकल डिव्हाईसच्या मदतीने वाचता येईल असे कोणत्याही वस्तूचा लिनियर रीप्रेझेन्टेशन म्हणता येईल. त्यात अनेक रेषा कमी जास्त अंतरावर दिसतात. त्यावरून उत्पादनाची किंमत, तारीख, वजन अशी माहिती मिळते. क्यूआर कोड म्हणजे क्विक रीस्पॉन्स कोड. हा चौकोनी आकारात असतो. त्यावर वस्तूची अधिक माहिती असते. शिवाय नंबर, अल्फाबेट, फोटो, व्हीडीओ सुद्धा त्यात असतात. १९९४ पासून हा कोड वापरात आला. प्रथम ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक भाग व स्पेअर पार्ट स्कॅन करण्यासाठी त्याचा वापर होत होता.

क्यूआर कोड वाचण्यासाठी खास प्रकारचे मोबाईल अॅप वापरले जाते. समजा एखाद्या दुकानाबाहेर क्यूआर कोड असेल तर तो स्कॅन केला कि दुकानाचे नाव, दुकानदाराचे नाव, त्याचे बँक अकौंट यांची माहिती त्यातून मिळते आणि मग तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूचे पेमेंट क्यूआर कोड वरून केले कि दुकानदाराच्या अकौंट मध्ये पैसे जमा होतात. या मुळे योग्य ठिकाणीच पेमेंट करणे शक्य होते.