समर्थन दिल्यावरही शिवसेनेला मुर्मू भेटीचे आमंत्रण नाही
भाजप पुरस्कृत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिल्याची घोषणा केली आहे. मात्र गुरुवारी मुंबई भेटीवर येत असलेल्या मुर्मू यांच्या भेटीचे ठाकरे नेतृत्वाखालील शिवसेनेला आमंत्रण दिले गेलेले नाही असे टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमी मध्ये म्हटले गेले आहे. हा सेनेला आणखी एक झटका मानला जात आहे.
गुरुवारी दुपारी मुर्मू मुंबईत येत असून राज्यातील सर्व आमदार, खासदारांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि राज्यमंत्री भारती पवार आहेत. विमानतळाजवळच्या एका हॉटेल मध्ये मुर्मू यांच्या भेटीसाठी सुमारे २५० आमदार खासदारांना निमंत्रण दिले गेल्याचे समजते. त्यात भाजपच्या सर्व १०६ खासदारांना मुंबई मध्ये हजर राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत तसेच एकनाथ शिंदे गटाचे ४० आणि अन्य १० असे ५० आमदार यांना आमंत्रण दिले गेले आहे.
शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुर्मू या आदिवासी महिला आहेत म्हणून त्यांना समर्थन दिले पाहिजे असा आग्रह धरला होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना समर्थन जाहीर केले आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राउत म्हणाले आम्हाला मुर्मू यांच्या भेटीचे आमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत सामील होण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही त्या आदिवासी महिला आहेत म्हणून त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.