गुगलला सुद्धा लागली जागतिक मंदीची चाहूल
यावर्षी जागतिक मंदी येणार की नाही त्याबाबत विविध तज्ञ विविध मते व्यक्त करत असले तरी टेक कंपन्यांना मंदीची चाहूल लागली आहे असे दिसत आहे. मेटा नंतर आता गुगलने सुद्धा कर्मचारी भरती कमी करण्याचे संकेत दिले आहेत. गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या संदर्भात आपल्या कर्मचार्यांना एक ईमेल लिहिली आहे.
या इमेल मध्ये पिचाई यांनी यंदा कंपनीत नवीन कर्मचारी भरतीचा वेग कमी केला जात असल्याचे नमूद केले आहे. ते म्हणतात यंदा कंपनीत आवश्यक तेवढीच नवीन भरती केली जाईल. २०२२-२३ मध्ये भरतीचा मुख्य फोकस फक्त अभियंते, तंत्रज्ञान विश्लेषक आणि खास कर्मचारी यांच्यावर राहील. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत कर्मचारी भरती कोटा पूर्ण झाला आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आर्थिक प्रभाव आपल्याला जाणवणार आहे. पिचाई यांच्या या इमेल मुळे त्यांना आर्थिक मंदीची जाणीव झाल्याचे मानले जात आहे.
पिचाई या मेल मध्ये पुढे लिहितात,’ अनिश्चित आर्थिक वातावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या विभागात पूर्ण कर्मचारी संख्येशिवाय काम चालतच नाही फक्त तेथेच आवश्यक तेवढी नवी भरती करण्यास कंपनीचे प्राधान्य राहील.’