माल्ल्याच्या मुली फेडणार वडिलांचे 200 कोटी कर्ज: तान्याला फोटोग्राफीमध्ये, लीनाला व्यवसायात रस, तिसरी मुलगी लैलाला दत्तक


लंडन : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फरारी मद्यसम्राट विजय माल्ल्याला अवमान प्रकरणी चार महिने तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. माल्ल्याला कोणताही पश्चाताप नसल्यामुळे शिक्षा आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. दंड न भरल्यास 2 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.

माल्ल्याला 40 दशलक्ष डॉलर म्हणजेच 317 कोटी रुपये 8 टक्के व्याजासह 4 आठवड्यांच्या आत परत करण्यास सांगितले आहे. माल्ल्याने ही रक्कम त्याच्या तीन मुलांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती.

माल्ल्यावर होते कोणते आरोप ?
माल्ल्यावर तथ्य लपविल्याचा आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. बँकांनी आरोप केला आहे की माल्ल्याला यूके स्थित ऑफशोर कंपनी डियाजिओकडून $40 दशलक्ष मिळाले होते, जे त्याने आपल्या तीन मुलांना हस्तांतरित केले. याचिकेनुसार, माल्ल्या यांनी त्यांचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्या आणि मुली लीना माल्ल्या आणि तान्या माल्ल्या यांना प्रत्येकी 13 दशलक्ष डॉलर्सची रक्कम हस्तांतरित केली होती.

मुलींना द्यावे लागणार 211 कोटी 33 लाख
सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्याची तीन मुले सिद्धार्थ, लीना आणि तान्या यांना 8% व्याजदराने चार आठवड्यात बँकांना $40 दशलक्ष परत करण्याचे आदेश दिले आहेत. जर आपण फक्त लीना आणि तान्याबद्दल बोललो तर दोघांना मिळून 8% व्याजाने 211 कोटी 33 लाख रुपये द्यावे लागतील. ही रक्कम वेळेवर न भरल्यास मुलांची मालमत्ताही वसुलीसाठी जप्त केली जाऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

लीना आणि तान्या आहेत दुसरी पत्नी रेखा माल्ल्याच्या मुली
विजय माल्ल्या यांनी पहिले लग्न समीराशी केले होते, जिला एक मुलगा सिद्धार्थ आहे. काही वर्षांनी समीरापासून घटस्फोट घेतल्यानंतर माल्ल्याने बंगळुरूमध्ये त्याच्या शेजारी राहणाऱ्या रेखाशी लग्न केले. विजय आणि रेखा यांना लीना आणि तान्या माल्ल्या नावाच्या दोन मुली आहेत.

कोण आहे तान्या माल्या
विजय माल्ल्या यांना तान्या माल्ल्या नावाची मुलगी आहे. तिला फोटोग्राफीची खूप आवड आहे. 2013 मध्ये तान्या ‘नॅशनल जिओग्राफिक स्टुडंट एक्सपिडिशन’साठी पॅरिसला डिजिटल फोटोग्राफी शिकण्यासाठी गेली होती.

तान्या सप्टेंबर 2010 मध्ये वादात सापडली होती. तिचे वडील विजय माल्ल्या यांनी 36 मजली ट्रम्प प्लाझा इमारतीत तिच्या नावावर एक पेंटहाऊस विकत घेतले, ज्याची किंमत $10 दशलक्ष आहे. त्याने $4.6 दशलक्ष दिले, परंतु न्यूयॉर्कच्या वित्त विभागाच्या कागदपत्रांनुसार, त्याने उर्वरित पैसे दिले नाहीत. त्यामुळे तान्याला पेंटहाऊस सोडावे लागले.

उद्योगपती लीना माल्ल्या
विजय माल्ल्याची दुसरी मुलगी लीना माल्ल्या आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एक बिझनेसवुमन आहे. लीनाने अमेरिकन नागरिकत्व घेतले असून ती सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहते.

लैला ही आहे विजय माल्ल्याची सावत्र मुलगी
लीनाशिवाय विजय माल्ल्या यांना लैला माल्ल्या नावाची सावत्र मुलगी आहे. लैला ही विजय माल्ल्याची दुसरी पत्नी रेखा आणि तिचा पहिला पती मिस्टर मेहमूद यांची मुलगी आहे, जिला नंतर विजय माल्ल्या यांनी दत्तक घेतले होते. लैलाने तिचा कौटुंबिक मित्र समर सिंहसोबत इंडोनेशियातील बाली बेटावरील एका रिसॉर्टमध्ये लग्न केले.

लैला आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यासोबत काम करत होती. 2010 मध्ये ललित मोदीच्या घरावर छापा टाकण्यात आला, तेव्हा एक महिला कागदपत्रांसह तेथे पोहोचली होती, सीसीटीव्ही फुटेजवरून तिची ओळख लैला माल्ल्या म्हणून झाली होती. पण, नंतर तिने ललित मोदींसोबत कोणतेही व्यावसायिक संबंध नसल्याचे सांगितले होते. लैला लाइफस्टाइल अॅक्सेसरीजचा व्यवसाय करते. तिचा व्यवसाय युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरला आहे.