नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी सुरू आहे. त्याच चौकशीदरम्यान, लॉरेन्सने उघड केले की त्याला 2018 मध्ये 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणातील आरोपी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मारायचे होते. सलमानला धडा शिकवावा, अशी लॉरेन्स बिश्नोईची इच्छा होती.
2018 मध्येच लॉरेन्स बिश्नोईला करायचा होता सलमानचा गेम, खरेदी केली होती 4 लाखांची रायफल, मुसेवाला खून प्रकरणाच्या चौकशीत खुलासा
चौकशीदरम्यान झाले उघड
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिश्नोईने सलमान खानच्या हत्येचा कट उघड केला. या हत्येसाठी त्याने गुंड संपत नेहराला मुंबईला पाठवले होते. आधीच ज्याची भीती होती, त्याशिवाय संपत नेहराने अभिनेत्याच्या घराची रेकी केली. सलमानला धडा शिकवावा असे बिष्णोईलावाटत होते, कारण तो काळवीट शिकार प्रकरणामुळे खूप संतापला होता.
4 लाखांना खरेदी केली खास रायफल
लॉरेन्स बिश्नोईने पोलिसांना सांगितले की नेहराकडे फक्त एक पिस्तूल होते. नेहराकडे असे कोणतेही हत्यार नव्हते, ज्यातून त्याला सलमानवर दुरून हल्ला करता येईल. त्यामुळेच त्याने हत्येचा कट रचण्यासाठी चार लाख रुपयांची स्पेशल स्प्रिंग रायफल खरेदी केली होती. या रायफलच्या सहाय्याने हा कट राबवला जाणार होता.
पोलिसांनी उधळून लावला होता कट
तथापि, 2018 मध्ये, पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश करत, दिनेश डागर नावाच्या व्यक्तीकडून रायफल जप्त केली, ज्याच्याकडून ती आयात केली गेली होती. काही दिवसांपूर्वी 6 जुलै रोजी काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानची बाजू मांडणारे वकील हस्तीमल सारस्वत यांनी दावा केला होता की, लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
काय आहे काळवीट प्रकरण
राजस्थानमधील कांकणी येथे दोन काळवीटांची शिकार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप सलमान खानवर होता. त्यावेळी सलमान खान ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये होता. बॉलीवूड अभिनेत्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या कलम 9/51 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.
झाली होती पाच वर्षांची शिक्षा
याशिवाय, काळवीटाची शिकार करताना कालबाह्य परवाना असलेली बंदूक बाळगल्याचा आणि वापरल्याच्या आरोपाखाली सलमानवर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25 आणि 3/27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात, 2018 मध्ये, जोधपूर न्यायालयाने त्याला दोन काळवीट मारल्याबद्दल दोषी ठरवले, त्यानंतर त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, या प्रकरणात त्याला नंतर जामीन मंजूर करण्यात आला.