ICC ODI Rankings : जसप्रीत बुमराह वनडेमध्ये अव्वल गोलंदाज, तर सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये पहिल्या पाचमध्ये


दुबई – इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला आयसीसी क्रमवारीतही याचा फायदा झाला आहे. बुमराह आता वनडेत जगातील अव्वल गोलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 19 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. यानंतर त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकून वनडेमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत बुमराहला पाच स्थानांचा फायदा झाला आहे.

टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने फलंदाजांच्या क्रमवारीतही मोठा फरक केला असून फलंदाजांच्या क्रमवारीत तो पाचव्या स्थानावर आला आहे. भुवनेश्वर कुमार हा टी-20 मध्ये टॉप 10 मध्ये एकमेव गोलंदाज आहे.

जसप्रीत बुमराह हा तीन गोलंदाजांपैकी एक आहे, जो कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात पहिल्या 10 क्रमवारीत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा घेत इतिहास रचला होता.

दुसऱ्या स्थानावर घसरला बोल्ट
गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत बुमराहच्या पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान पाचव्या स्थानावर आला आहे. इंग्लंडविरुद्ध तीन विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो 23व्या स्थानावर पोहोचला आहे.

टॉप 10 मध्ये कायम विराट आणि रोहित
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली चौथ्या आणि रोहित शर्मा पाचव्या स्थानावर कायम आहे. रोहितने इंग्लंडविरुद्ध नाबाद 76 धावांची खेळी केली होती, मात्र त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. आता त्याला उर्वरित मालिकेत चांगली कामगिरी करून विराटला मागे सोडण्याची संधी असेल. इंग्लंडविरुद्ध नाबाद 31 धावा करणाऱ्या शिखर धवनला एक स्थान पुढे मिळाले, असून तो 12व्या स्थानावर पोहोचला आहे.

आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने 10 स्थानांची प्रगती केली असून तो 34व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने अष्टपैलूंच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती करत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर बांगलादेशच्या मेहदी हसनला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे.