पाणीपुरी खाल्ल्याने वाढतो टायफाइड! तेलंगणा आरोग्य विभागाचा युक्तिवाद, जूनमध्ये 2,752 रुग्णांची नोंद


हैदराबाद : तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात टायफाइडचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यभरात टायफाइडच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाल्याचा ठपका येथील एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने पाणीपुरीवर ठेवला आहे. सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. श्रीनिवास राव म्हणाले की, टायफाइडला पाणीपुरी रोग असे म्हटले जाऊ शकते आणि लोकांना टायफाइड आणि इतर हंगामी आजारांपासून वाचवण्यासाठी सध्याच्या पावसाळ्यात हे आणि इतर रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला.

रस्त्यालगतच्या दुकानात पाणीपुरी खाण्याच्या अनेकांच्या सवयीचा संदर्भ देत त्यांनी त्यांचे आरोग्य बिघडवू नका, असे आवाहन केले. तुम्हाला पाणीपुरी 10-15 रुपयांना मिळू शकते, पण उद्या तुम्हाला 5,000-10,000 रुपये खर्च करावे लागतील, असे ते म्हणाले.

जूनमध्ये वाढली प्रकरणे
विक्रेत्यांनीही स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे आणि पिण्याच्या पाण्याचा वापर सुनिश्चित करावा, असे या अधिकाऱ्याने सांगितले. राव म्हणाले की, यावर्षी टायफाइडचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. मे महिन्यात 2,700 प्रकरणे नोंदवली गेली, तर जूनमध्ये ही संख्या 2,752 होती.

एका महिन्यात अतिसाराचे 6000 रुग्ण
दूषित अन्न, पाणी आणि डास ही हंगामी आजारांची प्रमुख कारणे म्हणून ओळखली जातात. यामुळे मलेरिया, तीव्र अतिसार (ADD) आणि विषाणूजन्य ताप होतो. गेल्या काही आठवड्यांत अशा मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर आली आहेत. या महिन्यातच राज्यभरात अतिसाराचे 6 हजार रुग्ण आढळले आहेत. राव यांनी लोकांना ताजे अन्न खाण्याचा आणि पिण्याचे पाणी उकळण्याचा सल्ला दिला.

जानेवारीपासून राज्यात डेंग्यूचे एकूण 1,184 रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. एकट्या हैदराबादमध्ये 516 प्रकरणे नोंदली गेली आहेत. जवळपास सर्वच जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जूनमध्ये डेंग्यूचे 563 रुग्ण आढळले, तर या महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत 222 रुग्ण आढळले.

राज्यात मलेरियाचे रुग्णही नोंदवले जात आहेत. ते म्हणाले की, जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांना अळ्याविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी प्रत्येक शुक्रवार हा कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोविडबाबतही सांगितले काळजी घेण्यास
गेल्या सहा आठवड्यांत कोविड-19 प्रकरणांची संख्या वाढली असली, तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असेही राव म्हणाले. ते म्हणाले की कोविडने स्थानिक टप्प्यात प्रवेश केला आहे आणि त्याची लक्षणे सामान्य सर्दी आणि ताप आहेत. कोविड हा देखील हंगामी आजार झाला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, जर कोणाला कोविड सारखी लक्षणे असतील, तर त्यांनी स्वतःला पाच दिवस क्वारंटाईन करावे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसतील, तर त्याला कोविड चाचणीची गरज नाही.

सार्वजनिक आरोग्य संचालक म्हणाले की, ज्या कोविड रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे. त्यांनी खाजगी रुग्णालयांना प्लेटलेट्सच्या अनावश्यक रक्तसंक्रमणापासून सावध केले.