नव्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उत्तर चुकले तरी भरपूर मिळणार बक्षीस

कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोचा १४ वा सिझन लवकरच सुरु होत असून रसिकांच्या भेटीला हा कार्यक्रम ६ ऑगस्ट पासून येत आहे. या नव्या सिझन मध्ये अनेक नियम बदल केले गेले असून त्यामुळे खेळाडूंना फायदा होणार आहे. चाहत्यांना या सिझन मध्ये डबल ख़ुशीचा लाभ होणार आहे.

पहिले म्हणजे यात जॅकपॉटची रक्कम सात कोटींवरून साडेसात कोटींवर नेली गेली आहे. या शोच्या चौथ्या सिझन पर्यंत ही रक्कम १ कोटी होती. नंतर पाचव्या सिझन मध्ये ती ५ कोटींवर आणि सातव्या सिझन मध्ये सात कोटींवर गेली होती. १४ व्या सिझन पासून ही रक्कम साडेसात कोटींवर जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात स्पर्धकाचे उत्तर चुकले तरी त्याला मोठी रक्कम मिळणार आहे. यापूर्वी ७ कोटी साठीच्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर स्पर्धक सरळ ३.२० लाखांवर येत असे. आता १ कोटींचे उत्तर दिल्यावर समजा साडेसात कोटींच्या प्रश्नांचे उत्तर चुकले तरी स्पर्धकाला ७५ लाख रुपये मिळणार आहेत.

तिसरा बदल म्हणजे या प्रश्नावलीत आणखी एक प्रश्न वाढवला गेला आहे. यापूर्वी १ कोटीच्या प्रश्नाच्या अगोदर ५० लाखांसाठीचा प्रश्न विचारला जात असे आता नव्या सिझन मध्ये ५० लाखांनंतर ७५ लाखाचा एक प्रश्न येईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा बदल केला गेला आहे. या शोची नोंदणी ९ एप्रिल पासून सुरु झाली असून आजपर्यंत हजारो स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. २००० साली सुरु झालेल्या या खेळाच्या १२ भागांचे संचालन अमिताभ बच्चन यांनी केले होते तर एका भागात शाहरुख खान होता.