चीनला पछाडून भारत बनणार सर्वाधिक लोकसंख्येचा देश

जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलै रोजी साजरा होतो. या दिवशी संयुक्त राष्ट्राने भारतासाठी एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र बनणार आहे. सध्या चीन १ नंबरचे सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र आहे मात्र भारत पुढील वर्षात चीनला पछाडून एक नंबरवर येणार आहे.

या अहवालानुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये जगात ८ अब्जाव्या व्यक्तीचा जन्म होईल. कारण तेव्हा जगाची लोकसंख्या ८ अब्ज असेल. १९५० पासून जागतिक लोकसंख्या मंदगतीने वाढते आहे.२०२० मध्ये वाढीचा हा दर १ टक्क्यापेक्षा कमी होता. युएनच्या ताज्या अहवालानुसार २०३० मध्ये जगाची लोकसंख्या ८.५ अब्ज, २०५० मध्ये ९.७ अब्ज तर २०८० मध्ये सर्वोच्च १०.४ अब्ज असेल.

भारताची लोकसंख्या २०२२ मध्ये १.४१२ अब्ज तर चीनची १.४२६ अब्ज आहे. २०२३ मध्ये भारताची लोकसंख्या अधिक वेगाने वाढून चीन पेक्षा जास्त होईल. २०२५ मध्ये भारताची लोकसंख्या १.६६८ अब्ज तर चीनची १.३१७ अब्ज असले. आरोग्य सुधारणा, प्रगती, विकास यामुळे माणसाची आयुष्यमर्यादा वाढली आहे. तसेच माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले आहे असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.