Weather Updates: 20 राज्यांमध्ये पावसामुळे ओढवले संकट, गुजरात आणि महाराष्ट्रात हाहाकार, आतापर्यंत 139 जणांचा मृत्यू


मुंबई – देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून 20 हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात 1 जूनपासून पाऊस आणि पुरामुळे 76 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत केवळ 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत
गुजरातमध्ये संततधार पावसामुळे 6 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली. आसाम, मेघालय या ईशान्येकडील राज्यांनंतर आता भारतीय हवामान खात्याने (IMD) मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मध्य प्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्यानुसार मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि जबलपूरसह 33 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तेलंगणात गोदावरी नदीने धोक्याची दुसरी पातळी ओलांडली आहे. सोमवारी दिल्ली-एनसीआर आणि मध्य प्रदेशात पाऊस पडला, तर राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरातमधील 9000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे 174 गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. एनडीआरएफ आणि एडीआरएफच्या टीम पूरग्रस्त भागात पोहोचून मदत आणि बचाव कार्य करत आहेत. आतापर्यंत 9000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. येथे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या एनडीआरएफच्या 13 आणि एसडीआरएफच्या 16 प्लाटून तैनात करण्यात आल्या आहेत. वडोदराहून एनडीआरएफची एक पलटण छोटा उदयपूरला मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील 388 रस्ते बंद आहेत.

महाराष्ट्रातील रत्नागिरीसह 12 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रातील रत्नागिरीसह 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून 8 जिल्ह्यांमध्ये यॅलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाकडून संबंधित विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र: भीमाशंकर मंदिर रस्त्यावर दरड कोसळली, जीवितहानी नाही
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भीमाशंकर मंदिर रस्त्यावर सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसून कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भीमाशंकर मंदिर हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे खेड तालुक्यात पुण्यापासून 100 किमी अंतरावर आणि मुंबईपासून 200 किमीपेक्षा जास्त अंतरावर आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुरेश पठाडे यांनी सांगितले की, पोखरी घाटात पहाटे तीन वाजता दरड कोसळली. ढिगाऱ्यांमुळे घोरगाव-भीमाशंकर रस्ता अर्धवट ठप्प झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन माने म्हणाले, दरड कोसळल्याने रस्ता काही प्रमाणात बंद झाला होता, मात्र त्यानंतर एका बाजूने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरड हटवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावरील अनेक मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 68.4 मिमी पाऊस झाला आहे.