धोनीच्या पोल्ट्री मधील कडकनाथ विक्रीसाठी तयार, किलोला १ हजाराचा दर
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि रांची चा राजकुमार म्हणून ओळख मिळविलेला महेंद्रसिंग धोनी उर्फ माही यांच्या फार्म हाउस वरील पोल्ट्री मध्ये वाढलेले कडकनाथ कोंबडे आता विक्रीसाठी तयार झाले आहेत. खास जातीच्या या कोंबड्याचे मांस आणि अंडी अतिशय पौष्टिक असतात आणि त्यांना चांगली किंमत मिळते. धोनी च्या पोल्ट्री मधील कडकनाथ कोंबडे ८०० ते १ किलो वजनाचे झाले असून त्यांची विक्री किलोला ८०० ते १ हजार रुपये भावाने होत आहे.
एप्रिल मध्ये धोनीने झाबूआ मधून २ हजार कडकनाथ पिले पाळण्यासाठी आणली होती. त्यांच्या साठी त्याने फार्म हाउस वर वेगळी पोल्ट्री तयार केली आहे. या कोंबड्यांचे मास आणि अंडी सेवन केल्यास प्रोटीन खूप प्रमाणात मिळतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते असे म्हणतात. धोनीच्या कडकनाथ कोंबड्यांची विक्री थेट बाजारात होणार नाही तर ते खरेदी साठी धोनीच्या फार्मवर ग्राहकांना जावे लागणार आहे. गेल्या वेळी त्याने फार्म हाउसच्या बाहेर भाजी लेआउट सुरु केले होते तेथेही हे कोंबडे विकले गेले होते. या जातीचे कोंबडे जगात दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत. मध्यप्रदेश सरकारने तीन वर्षांपूर्वी त्याचा जीआय टॅग (भूगोलिक विशेषता) मिळविला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात धोनीच्या फार्म हाउस वरील सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाज्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री साठी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्यात टोमॅटो, भेंडी, घेवडा, वांगी यांचा समावेश आहे.