कोण आहेत भाजपने लक्ष केंद्रित केलेले पसमांदा मुस्लीम?
हैद्रबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पसमांदा मुस्लिमांसाठी स्नेहयात्रा काढण्याची घोषणा केल्यापासून हे पसमांदा मुस्लीम एकदम चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेश मुस्लिमांसाठी ९०:१० योजना भाजपने आखली असून तिचा थेट संबध या पसमांदा मुस्लीम समाजाशी आहे. उत्तर प्रदेश विधान सभेत भाजपला यंदा ८ टक्के मुस्लीम मते मिळाली असून त्यात या वर्गाच्या मुस्लीम समाजाचा वाटा जास्त आहे असे सांगितले जाते.
कोण आहेत हे पसमांदा मुस्लीम? या मुस्लिमांच्या मुद्द्यांवर काम करणारे डॉ. फैय्याज अहमद फैजी यांनी भाजपने टाकलेले ही चांगले पाउल असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात हा समाज वंचित आहे आणि त्यांच्यासाठी आजपर्यंत कुणीच काम केलेले नाही. भाजप याचा राजकीय फायदा उठवेल हे खरे असले तरी या समाजाला काहीतरी प्रतिनिधित्व मिळेल, जे फार गरजेचे आहे.
उत्तर प्रदेशात अशराफ मुस्लीम १० टक्के तर पसमांदा ९० टक्के आहेत. मुरादाबाद, मेरठ, वाराणसी, अलिगढ, येथे त्यांची जास्त संख्या आहे. मुस्लीम समाजात मूळचे भारतीय आणि विदेशातून आलेले असे दोन मुस्लीम गट आहेत. अशरफ विदेशी मुस्लीम आहेत ते त्यांच्या शासकाचेच आदेश मानतात. पसमांदा हे मात्र कधीकाळी हिंदू असलेले आणि नाईलाजाने धर्मांतर करून मुस्लीम बनलेले आहेत. हे वंचित आणि मागास आहेत. त्यांना अज्लाफ म्हटले जाते तर जे हिंदू मधील दलित प्रमाणे मागासवर्गीय आहेत त्यांना अरजाल म्हटले जाते. हे दोन्ही वर्ग मिळून पसमांदा मुस्लीम समाज बनला आहे. पसमांदा हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ मागासलेले असा आहे.