Sri Lanka Economic Crisis : आंदोलकांनी घातला राष्ट्रपतींच्या घराला घेराव, गोटाबाया राजपक्षे त्यांच्या निवासस्थानातून गेले पळून


कोलंबो – श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा रोष अजूनही शांत झालेला नाही. देशभरात तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असताना लोक पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहेत. शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांच्या जमावाने त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, या निदर्शकांनी राष्ट्रपतींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढला.

काही आंदोलक राष्ट्रपती निवासाच्या आवारात घुसल्याचे वृत्त आहे. यानंतर सुरक्षा दलांनी राष्ट्रपतींना घराबाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी नेले. श्रीलंकेतील सिरसा टीव्ही या चॅनलने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये राष्ट्रपतींच्या निवासस्थानात जमाव प्रवेश करताना दिसत आहे. मात्र, सुरक्षा दलांनी पाण्याच्या तोफा आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. निदर्शनादरम्यान 30 हून अधिक लोक जखमी झाले.

उल्लेखनीय म्हणजे, श्रीलंका गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अन्नापासून ते इंधनापर्यंत संपूर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. घरांमध्येही वीज काही तासच येत आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा सतत कमी होत असल्याने ते वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक वस्तूही आयात करू शकत नाही.

पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि तातडीने तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या सहभागाने तातडीची बैठक बोलावली आहे. श्रीलंकेच्या डेली मिररने पंतप्रधानांच्या मीडिया विभागाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याही उतरला मैदानात
त्याच वेळी, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी कोलंबोमध्ये नुकत्याच झालेल्या निदर्शनांबाबत वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, मी या निषेधाचा भाग आहे आणि लोकांच्या मागणीसोबत उभा आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे.