विप्रो नावाचा असा आहे इतिहास

भारतात माहिती तंत्रज्ञानातील तीन नंबरची कंपनी विप्रो आणि तिचे मालक अझीम प्रेमजी नेहमीच चर्चेत असतात. अझीम यांची ओळख दानशूर उद्योजक अशीच आहे. आज विप्रो म्हटले कि आयटी दिग्गज अशीच कल्पना केली जात असली तर या नावाचा इतिहास मात्र खूपच वेगळा आहे. या कंपनीचे पूर्ण नाव ‘वेस्टर्न इंडियन पाम रिफाईड ऑईल लिमिटेड’ असे असून १९४७ मध्ये अझीम यांचे वडील एमएच हाशम यांनी एक जुनी तेल मिल विकत घेऊन या व्यवसायाचा पाया घातला होता.

१९६६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर या कंपनीची धुरा अझीम यांच्यावर आली तेव्हा ते फक्त २१ वर्षाचे होते. त्यांनी अमेरिकेतून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग केले होते. त्यांनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट लिमिटेड या नावाने फास्ट मुव्हिंग कन्झुमर गुडस म्हणजे एफएमसीजी सुरु केली. वनस्पती तेल, साबण आणि टीन कंटेनरचे उत्पादन येथे होत असे. पण अझीम नवीन संधीच्या शोधात होते. १९७७ मध्ये जनता सरकार आल्यावर त्यांनी आयबीएम या आयटी कंपनीला देश सोडण्याचा आदेश दिला आणि हीच संधी अझीम यांनी साधली. त्यांनी संगणक हार्डवेअर बनविण्याची सुरवात केली आणि १९७९ मध्ये पहिला संगणक बनविला आणि उत्पादन, विक्री सुरु केली. दोन दशकात यांनी सर्वात मोठी संगणक कंपनी अशी ओळख मिळविली. २००० मध्ये त्यांची कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड झाली.

याच वेळी त्यांनी बीपीओ सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आणि स्वस्त दरात कामे करून अनेक जागतिक ऑफर्स मिळविल्या. लवकरच आयटी क्षेत्रात कंपनी तीन नंबरवर आली. जुलै २०२२ मध्ये जगातील मौल्यवान कंपनी यादीत विप्रो सामील झाली असून स्टॉक मार्केट मध्ये ५४ हजार कोटींचे इक्विटी शेअर्स आहेत. कंपनीत देश विदेशात मिळून २,३१,६७१ कर्मचारी आहेत. कंपनीचे सध्याचे सीईओ थियरी डेलापोर्टे आहेत. त्यांना ७९.८ कोटी रुपये पगार दिला जातो.