सीमेवर गस्त घालणार ‘खामोश प्रहरी’ रोबो
भारतीय वैज्ञानिकानी तयार केलेले रोबो लवकरच आंतरराष्ट्रीय सीमेवर निगराणी करण्यासाठी सज्ज होत असून डीआरडीओच्या मदतीने तयार केलेल्या या रोबोंचे नामकरण ‘खामोश प्रहरी’ असे केले गेले आहे. सीमेलगतच्या कुंपणाजवळ हे रोबो तैनात करण्यात येतील. शत्रूची काही हालचाल झाली तर काही सेकंदात त्यांची माहिती हे रोबो देऊ शकतात.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित म्हणजे एआय तंत्रज्ञान आधारित ७५ पेक्षा अधिक संरक्षण तंत्रे लाँच केली जात असल्याचे सांगितले आहे. त्यात खामोश प्रहरी रोबोंचा समावेश आहे. असे रोबो द.कोरिया आणि इस्रायल मध्ये बनविले गेले आहेत.
संरक्षण सचिव डॉ. जयकुमार या संदर्भात म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात हे तंत्रज्ञान तिन्ही सेना दले, निमलष्करी दले याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगात येत आहेत. यातील काही डिव्हायसेस अशीही आहेत कि सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्याचा वापर करू शकतील. स्वयंचलित, मानवरहित, रोबोटिक्स प्रणाली सायबर सुरक्षा, सप्लाय चेन, संचार अश्या क्षेत्रात महत्वपूर्ण ठरत आहेत. तसेच देशाच्या सीमांची निगराणी त्यामुळे अधिक चोखपणे होऊ शकणार आहे.