शिन्जो आबे यांचा परिवार आणि संपत्ती किती?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे दोस्त आणि भारताच्या पद्मविभूषण सन्मानाने नावाजले गेलेले जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना एक ब्लॉग लिहिला आहे. जगाच्या विविध देशांचे नेते आबे यांना श्रद्धांजली देत आहेत. कोण होते शिन्जो आबे आणि कसा आहे त्यांचा परिवार या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे.

शिन्जो आबे हे जपानच्या प्रभावशाली राजकीय परिवाराचे सदस्य होते. त्यांचे आजोबा केना व वडील सिंतारो लोकप्रिय राजकीय नेते होते तर आई जपानचे माजी पंतप्रधान नोबोशुको कीशी यांची कन्या होती. शिन्जो यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५४ रोजी टोक्यो मध्ये झाला. राजकारण विषयातच पदवी घेतल्यावर त्यांनी पुढील शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले आणि परत मायदेशी येऊन स्टील प्लांट मध्ये नोकरी सुरु केली. १९८२ मध्ये नोकरी सोडून ते राजकारणात आले. त्यापूर्वी त्यांनी अनेक सरकारी पदांवर काम केले होते. १९९३ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढविली.

२००६ मध्ये ते लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातर्फे पंतप्रधान बनले तेव्हाच त्यांनी दोन रेकॉर्ड नोंदविली. पहिले म्हणजे युद्धानंतर ५२ व्या वर्षीच पंतप्रधान बनून सर्वात तरुण पंतप्रधान बनले आणि दुसरे म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जन्म झालेले ते पहिले पंतप्रधान होते. १९८७ मध्ये त्यांचा विवाह एकी मात्सुजाकी यांच्याबरोबर झाला. या जोडप्याला मुलबाळ नाही. फोर्ब्सच्या माहितीनुसार आबे यांची एकूण संपत्ती १० दशलक्ष डॉलर्स असून त्याची टोक्यो मध्ये अनेक घरे आणि जमिनी आहेत. त्यांची विदेशात सुद्धा मालमत्ता आहे असे सांगतात.

जपानच्या अर्थव्यवस्थेला नवे वळण देण्याचे मोठे काम त्यांनी केले. भारतात जसे ‘ मोदीनॉमिक्स” तसे जपानी अर्थव्यवस्थेत ‘आबेनॉमिक्स’ नावाने अर्थव्यवस्थेतील नीती जपान मध्ये प्रसिद्ध आहेत.