मस्क यांचा ट्विटर खरेदीस नकार, ट्विटर जाणार न्यायालयात
टेक टायटन एलोन मस्क यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी करणार नसल्याची घोषणा केली असून ४४ अब्ज डॉलर्स करारासाठी पुढे केलेले पाउल मागे घेतले आहे. या घोषणेमुळे ट्विटरचा शेअर एकदम कोसळून ३६.८१ डॉलरवर घसरला आहे. हा करार न करण्यामागे मस्क यांनी ट्विटरने बनावट अकौंट संदर्भात खोटी माहिती दिली असल्याचा आरोप करून हे डील फायनल करणार नसल्याचे म्हटले आहे. करार करताना ट्विटरने फेक अकौंटची संख्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे नमूद केले होते पण मस्क यांचा असा आरोप आहे कि ट्विटरवर फेक अकौंटची संख्या २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि ही माहिती कंपनीने लपविली.
टेस्ला सीईओ मस्क यांनी शुक्रवारी फायलिंग मध्ये ट्विटरवर आरोप करून ट्विटरने बनावट आणि स्पॅम अकौटची माहिती शेअर करावी असे आवाहन दिले आहे. याला उत्तर देताना ट्विटरचे बोर्ड अध्यक्ष ब्रेट टायलो यांनी मस्क यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत हे डील आम्ही करणार आणि त्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार. ट्विटर खरेदीसाठी मस्क दीर्घकाळ मेहनत करत होते. त्याच्यासमोर रोख रकमेची समस्या होती. या वर्षअखेर त्यांनाच हे डील पूर्ण करायचे होते.
या संदर्भात मस्क यांनी २१ अब्ज डॉलर्स रोख स्वरुपात द्यायचे होते. तेव्हा मस्क यांनीच त्यांना १३ अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळेल आणि उरलेले १२.५ अब्ज डॉलर्स टेस्लाचे शेअर्स विकून देण्याची तयारी दाखविली होती. पण ट्विटरचे डील केल्यापासून टेस्लाचा शेअर घसरत चालला आहे आणि क्रीप्टो करन्सी मधील घसरण यामुळे मस्क यांना पैसे गोळा करणे अवघड बनले असल्याची चर्चा सुरु आहे. परिणामी मस्क यांना डील मोडले तर १ अब्ज डॉलर्स दंड भरावा लागेल असेही समजते.