गौतम अदानी आता टेलेकॉम क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत
आशियातील धनकुबेर, अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आता टेलेकॉम क्षेत्रात एन्ट्री करत असून या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्याची नवी योजना आखली गेली आहे. मिडिया रिपोर्टनुसार या महिन्यात होत असलेल्या आगामी फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलावात अदानी सहभागी होत असून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. या क्षेत्रात अदानी यांची स्पर्धा थेट अंबानी यांच्या जिओ आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेल बरोबर असेल.
फाईव्ह जी टेलीसेवा हायस्पीड इंटरनेट संपर्क प्रदान करण्यात सक्षम आहे. या लहरींच्या लिलावासाठीच्या निविदा भरण्याची मुदत शुक्रवारी संपली. अदानी समूहाने ८ जुलै रोजीच निविदा भरली होती. हे लिलाव २६ जुलै रोजी होणार आहेत. त्यात जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या तीन कंपन्याच्या बरोबर अदानी समूह चौथा दावेदार आहे. या समूहाने नुकतीच एनएलडी, आयएलडी परवाना मिळवला असल्याचे समजते. मात्र त्याची अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोघेही गुजराथ चे असून दोघांनीही मोठे उद्योगसमूह स्थापले आहेत. मात्र कोणत्याच व्यवसायात ते थेट आमने सामने आलेले नाहीत. रिलायंस तेल, पेट्रोलियम, दूरसंचार, रिटेल मध्ये आहेत तर अडाणी समूह बंदरे, विमानतळ, कोळसा, उर्जा वितरण क्षेत्रात आहेत. फाईव्ह जी स्पेक्ट्रम मध्ये मात्र आता हे दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनू शकतात.