Mahindra Shares Shines : सप्टेंबरमध्ये येणार महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही


नवी दिल्ली – महिंद्रा ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) च्या समभागांनी शुक्रवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर महिंद्रा ग्रुपच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर 1,191.90 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (BII) यांच्यातील करारानंतर M&M शेअर्समध्ये ही तेजी दिसून आली आहे. ब्रिटीश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (BII) ने महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपमध्ये 1,925 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन इलेक्ट्रिक चारचाकी प्रवासी वाहन बनवण्यासाठी कंपनीला हा निधी मिळाला आहे.

BII महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 4.8% च्या शेअरसह गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक नवीन इलेक्ट्रिक चारचाकी प्रवासी वाहनाच्या निर्मितीवर खर्च केली जाईल. त्याच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या युनिटची संपूर्ण मालकी महिंद्रा अँड महिंद्राकडे असेल. महिंद्राने गुरुवारी ही माहिती दिली.

महिंद्राला BII कडून गुंतवणूक मिळाल्याच्या या वृत्तानंतर, शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात महिंद्राच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. कंपनीच्या समभागांनी 5.4% ची विक्रमी ताकद वाढून प्रति समभाग रु. 1194.9 वर पोहोचला आहे.

महिंद्रा कंपनीच्या नवीन ईव्ही युनिटमध्ये इलेक्ट्रिक स्पोर्ट्स युटिलिटी वाहन तयार होईल. या युनिटच्या स्थापनेमुळे कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग सेटअप, पुरवठा साखळी, डीलर्स आणि फायनान्सर्सना अतिरिक्त सहाय्य मिळेल.

महिंद्रा कंपनीचे ऑटो आणि फार्म सेक्टरचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 2027 पर्यंत आम्हाला आमच्या एकूण उत्पादनाच्या 20 टक्क्यांवरून 30 टक्के इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन करायचे आहे.

कंपनी ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान, प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजी आणि उत्पादनांची माहिती जाहीर करेल, असेही जेजुरीकर यांनी म्हटले आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही सप्टेंबरमध्ये समोर येईल. महिंद्राने सांगितले की नवीन युनिटसाठी एकूण भांडवली खर्च 2024 ते 2027 दरम्यान सुमारे 80 अब्ज रुपये ($1.01 अब्ज) अपेक्षित आहे.

महिंद्राकडून असेही सांगण्यात आले आहे की ते ब्रिटीश डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या सहकार्याने आपल्या EV कंपनीसाठी इतर गुंतवणूकदारांना देखील आणेल जेणेकरून कंपनीच्या निधीच्या गरजा व्यवस्थितपणे पूर्ण करता येतील.