कोल्हापुरात पाण्याच्या टँकरवर काढली वरात, पाणी संकटावर प्रकाश टाकण्यासाठी पुढाकार


कोल्हापूर – कोल्हापुरातील अनियमित पाणीपुरवठ्याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी एक जोडप्याने पुढाकार घेतला. एका नवविवाहित जोडप्याने पाण्याच्या टँकरवर त्यांची वरात काढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी केला.

विशाल कोळेकर (32) यांचे गुरुवारी लग्न झाले आणि त्यानंतर नवविवाहित जोडप्याने पाण्याच्या टँकरवर वरात काढून त्यांच्या परिसरातील पाण्याची समस्या मांडली. खासगी कंपनीत काम करणारे विशाल कोळेकर म्हणाले की, आमचा प्रिन्स क्लब नावाचा सोशल ग्रुप असून त्याद्वारे आम्ही मंगळवार पेठेतील काही भागात अनियमित पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाला माहिती देत आहोत. आम्ही आजवर मागण्या करूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

विशालच्या म्हणण्यानुसार, या भागातील पाणीपुरवठा अनिश्चित असल्याने लोकांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते. विशाल कोळेकर आणि त्यांची पत्नी अपर्णा यांनी वरातीसाठी कारऐवजी पाण्याच्या टँकरचा वापर केला. टँकरवर एक बॅनर होता, ज्यावर पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही, असे लिहिले होते.