Amravati Murder : उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मोठा कट, एका गटाला धर्माच्या आधारे पसरवायचे होते शत्रुत्व


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या हा एक मोठा कट होता आणि देशातील एका भागात दहशत पसरवणे हा त्यामागचा उद्देश होता. एनआयएने आपल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे. या घटनेचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता राष्ट्रीय तपास यंत्रणेला आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये अशाच धर्तीवर कन्हैयालालच्या हत्येच्या आठवडाभरापूर्वी अमरावतीची घटना घडली होती. एनआयए या दोन्ही हत्यांचा तपास करत आहे. एनआयएचे म्हणणे आहे की, केमिस्ट कोल्हे यांच्या हत्येचा कट काही लोकांच्या गटाने रचला होता. देशातील लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. हल्लेखोरांना धर्माच्या आधारावर लोकांमध्ये तेढ पसरवायची होती. हा एक मोठा कट होता, असे एनआयएचे मत आहे.

नोंदवला नवीन एफआयआर
2 जुलै रोजी, एनआयएने केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 16, 18 आणि 20 अंतर्गत पुन्हा गुन्हा नोंदवला. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील अमरावती येथील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला 21 जून रोजी कोल्हेच्या निर्घृण हत्येची माहिती मिळाली आणि मृताचा मुलगा संकेत उमेश कोल्हे याच्या तक्रारीवरून 22 जून रोजी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीच्या घनश्याम नगर भागात राहणारे कोल्हे हे दुकानातून घरी परतत असताना रात्री दहाच्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली.

तपासात समोर आलेल्या तथ्यांनुसार, आयपीसीच्या कलम 153 (अ), 153 (बी) आणि 120 (बी) आणि यूए (पी) कायद्याच्या कलम 16, 18 आणि 20 तसेच तपास यंत्रणा कायदा 2008 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 1 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.

आठ आरोपींना अटक
कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद, युसूफ खान बहादूर खान आणि शाहीम अहमद फिरोज अहमद यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना महाराष्ट्र पोलिसांनी पकडले. NIA ने बुधवारी या प्रकरणी 13 ठिकाणी झडती घेतली आणि द्वेषाची पत्रके असलेली विविध दोषी कागदपत्रे जप्त केली.

फेसबुकवर केली होती पोस्ट
अमरावती येथील केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे (54) यांची 21 जूनच्या रात्री फेसबुकवर भारतीय जनता पक्षाच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर 28 जून रोजी उदयपूरमध्ये कन्हैयालाल टेलरची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.