जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे गोळीबारात ठार

जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी नारा शहरात एका कार्यक्रमादरम्यान गोळी झाडली गेली आणि त्यात आबे यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. रविवारी उच्च सभागृहाच्या निवडणुका जपान मध्ये होत असून त्याच्या प्रचारासाठी आबे नारा शहरात आले होते. मिडिया रिपोर्ट नुसार सभा सुरु असताना अचानक आबे खाली कोसळले तेव्हा त्यांच्या छातीतून रक्तस्त्राव होत होता. त्यांची हालत गंभीर बनल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात नेले गेले पण तेथे त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले गेले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्या कडून बंदूक जप्त करण्यात आली आहे. त्याने का गोळीबार केला याचा खुलासा अजून झालेला नाही. अधिक चौकशी मध्ये आबे यांच्या छातीत गोळी घुसली आणि त्यानंतर त्यांना लगेच हृदय विकाराचा झटका आला असे समजते. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहिती नुसार गोळीबाराचा आवाज आला आणि आबे खाली कोसळले तेव्हा त्यांच्या अंगातून रक्त वाहत होते.

६७ वर्षीय शिन्जो लिबरेशन डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. २००६ ते २००७ आणि पुन्हा २०१२ ते २०२० या काळात ते जपानचे पंतप्रधान होते. सलग आठ वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे त्यांचे रेकॉर्ड आहे. आबे यांची ओळख आक्रमक नेता अशी होती. त्यांना पोटाचा विकार कोलायटीस चा त्रास होत होता तेव्हा त्यांनी २००७ साली पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. पण पुन्हा त्यांनी ही जबाबदारी सलग आठ वर्षे सांभाळली होती.