उद्धव ठाकरे यांच्या हातातून जाणार धनुष्यबाण?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत नव्या निवडणूक चिन्हाची तयारी ठेवा असे आदेश दिले आहेत. यामुळे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर नवे सरकार सत्तेवर आले आहे. शिवसेनेतून उठाव करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने सत्ता काबीज केली असताना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह शिवसेनेच्या हातून जाणार असे संकेत मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळ सचिवालयाने ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर अभ्यास करून काही निर्णय नुकतेच जाहीर केले आहेत. त्यानुसार विधिमंडळाने शिंदे गटाला मान्यता दिली असून पूर्वी सुद्धा शिंदे हेच विधिमंडळ नेते होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नव्याने गटनेतेपदी नेमणूक केलेल्या अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द ठरले आहे. तसेच शिंदे यांनी नेमलेल्या भरत गोगावले यांचे प्रतोदपद मान्य केले गेल्याने सुनील प्रभू यांचे प्रतोदपद रद्द ठरले आहे.
या सर्व घडामोडींमुळे आणि आगामी बीएमसी तसेच अन्य महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना नव्या चिन्हासह कमीत कमी कालावधीत लोकांपर्यत पोहोचण्याची तयारी ठेवा असे आदेश दिल्याचे समजते. ‘ निवडणूक चिन्ह गमावल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असे ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते. महापालिका निवडणुकीच्या मुळे उद्धव ठाकरे यांच्या पुढे नवे आव्हान निर्माण झाल्याचे मानले जात असून त्याच्या तयारीला ठाकरे लागले आहेत असे मानले जात आहे.