कोरोनामध्ये विकल्या जाणाऱ्या डोलो या औषधाच्या कंपनीवर छापा, मालकावर कर चोरीचा संशय


आयकर विभागाने बुधवारी कथित करचुकवेगिरीच्या आरोपाखाली, डोलो-650 टॅब्लेट तयार करणाऱ्या बेंगळुरूस्थित औषधी कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या परिसराची झडती घेतली. हे औषध (डोलो-650) ताप आणि वेदना कमी करण्यासाठी कोविड-19 महामारी दरम्यान मोठ्या प्रमाणावर वापरले गेले.

अधिका-यांनी सांगितले की, आयकर विभाग तपासाचा एक भाग म्हणून कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड आणि स्टेटमेंट तपासत आहे. छाप्याच्या तपशीलाबाबत विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी मालकांवर करचुकवेगिरीच्या संशयावरून विभागाने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही.

मायक्रो लॅब्स लिमिटेड ही फार्मास्युटिकल उत्पादने आणि API चे उत्पादन आणि वितरण करण्यात गुंतलेली आहे. परदेशी व्यवसायाव्यतिरिक्त, कंपनीचे देशभरात 17 उत्पादन युनिट्स आहेत. Dolo-650, Amlong, Lubrex, Diapride, Vildapride, Olmat, Avas, Tripride, Bactoclave, Tenepride-M आणि Arbitel ही त्याची प्रमुख फार्मा उत्पादने आहेत.

कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 2020 मध्ये कोविड महामारी सुरू झाल्यापासून, कंपनीने डोलो-650 च्या 350 कोटीहून अधिक गोळ्या विकल्या आहेत आणि गेल्या एका वर्षात सुमारे 400 कोटी रुपये कमावले आहेत.