मुख्तार अब्बास नकवी- उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार?

भाजप मधील प्रमुख नेते आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी कॅबिनेट मिटिंग नंतर त्यांनी आपला राजीनामा दिला असून गुरुवारी त्यांचा राज्यसभेतील कार्यकाल संपत आहे. एनडीए तर्फे नकवी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार बनविले जाणार असल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. या रेसमध्ये त्यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यांनी अनेकदा केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.

१५ ऑक्टोबर १९५७ रोजी प्रयागराज येथे जन्मलेले मुख्तार अब्बास नकवी यांनी मास कम्युनिकेशन क्षेत्रात शिक्षण घेतलेले आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच ते विद्यार्थी नेते बनले. आणीबाणीच्या काळात नैनी तुरुंगात त्यांना डांबले गेले होते. २०१० ते १६ या काळात ते राज्यसभेवर निवडून गेले तर १९९८ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. रायपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळविणारे ते पहिले मुस्लीम उमेदवार आहेत.

अटल बिहारी सरकार मध्ये त्यांनी केंद्रीय माहिती प्रसारण विभागाचे राज्यमंत्रीपद भूषविले. २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांना अल्पसंख्यांक मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि नंतर २०१६ मध्ये कॅबिनेट मंत्री बनविले गेले. २०१९ च्या निवडणुका जिंकल्यावर पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये त्यांचा मंत्री म्हणून समावेश केला गेला. नकवी यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाचा कारभार आता स्मृती इराणी यांच्या कडे सोपविला गेला आहे.