बोरिस जोन्सन पेचात, आणखी ३९ खासदारांचे राजीनामे
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांच्या समोरील पेच अधिक गुंतागुंतीचा झाला असून गेल्या ४८ तासात पाच कॅबिनेट मंत्र्यांसह अन्य ३९ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या महिन्यात तत्कालीन अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद यांनी बोरिस यांचे सरकार वाचविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती पण आता या दोघांनीही बोरिस यांची साथ सोडली आहे.मंगळवारी या दोघांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिल्यावर त्यांच्या पाठोपाठ अन्य ३९ खासदारांनी सुद्धा राजीनामे दिले आहेत. बोरिस सरकारवर गेल्या एक महिन्यात दोन वेळा या संकटाला सामोरे जाण्याची पाळी आली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर राजीनामे दिले गेल्याने बोरिस यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाब वाढला आहे मात्र पुन्हा निवडणुका घ्याव्या लागू नयेत यासाठी बोरिस राजीनामा देण्यास तयार नाहीत. पार्टीगेट प्रकरणात गेल्याच महिन्यात त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नियमानुसार १२ महिन्यात दुसरा अविश्वास ठराव आणता येत नाही. मात्र त्यांचेच खासदार हा नियम रद्द करावा किंवा १२ महिनांच्या कालावधी कमी करावा अशी मागणी करत आहेत. राजीनामा सत्र सुरु झाल्याने बोरिस यांचे बहुमत गेले तर राजीनामा द्यायचा का नाही याचा निर्णय बोरिस घेतील असे सांगितले जात आहे.
बोरिस यांना राजीनामा द्यावा लागलाच तर त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली असून पक्षातील अनेक नेते या पदासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यात माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान निवडीसाठी पार्टी खासदार अनेक पातळ्यांवर मतदान करतात. मतदान करून शेवटचे दोन उमेदवार राहीपर्यंत मतदानाच्या फेऱ्या सुरु राहतात. मंगळवार आणि गुरुवार अश्या दोन दिवशी मतदान घेतले जाते अशी येथील प्रथा आहे. शेवटच्या दोन उमेदवारांमध्ये जो अधिक मते मिळवितो त्याला पंतप्रधानपद मिळते.