उडनपरी पीटी उषाला एनडीएकडून राज्यसभेसाठी नामांकन

ट्रॅक अँड फिल्ड मध्ये भारताचे नाव रोशन करणारी पीटी उषा हिचे मोदी सरकारने राज्यसभेसाठी नामांकन केले आहे. पिल्लाउल्लाकांडी थेक्के पराम्बील उषा हिची ओळख क्रीडा क्षेत्रात ‘क्वीन ऑफ ट्रॅक’ अशी आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून पीटी उषाच्या राज्यसभा उमेदवारीची माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘क्रीडा क्षेत्रासाठी उषाने दिलेले योगदान सर्वाना परिचित आहे. गेली अनेक वर्षे ती नवोदित अॅथलीटसना मार्गदर्शन करण्यासाठी खूप काम करत आहे. राज्यसभेसाठी नामांकन मिळाल्याबद्दल शुभेच्छा.’

केरळच्या कुट्टाली गावात जन्मलेली उषा लहानपणापासून पाय्योली एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. शाळेपासूनच खेळातली तिची चमक दिसून येत होती. १९८० च्या दशकात ट्रॅक अँड फिल्ड त्यातही खास करून आशियाई खेळात तिचा दबदबा होता. तिच्या नावावर २३ मेडल्स असून त्यातील १४ सुवर्णपदके आहेत. ५८ वर्षीय उषाने १९८६ च्या सोल आशियाई स्पर्धेत २००,४००, ४०० मीटर अडथळे शर्यत आणि ४ बाय चार रिले अश्या चारी प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. दिल्ली आशियाई गेम्स मध्ये तिने दोन रजत पदके मिळविली होती.

ऑलिम्पिक साठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवा खेळाडूना उषा केरळ बळूसेरी उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स येथे प्रशिक्षण देण्याचे काम सध्या करत आहे. संसदेत सुद्धा अॅथलेटिक्स विकासासाठी ती कार्यरत राहील असे सांगितले जात आहे.