Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव 15 गंभीर आजारांनी ग्रस्त, जाणून घ्या आता कशी आहे त्यांची प्रकृती, पुढे काय होणार?


नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी ते पाटणा येथील घरात पडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याच्या खांद्याचे हाड तुटले. तसेच शरीराच्या इतर भागांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

सोमवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पाटण्याच्या पारस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. लालू प्रसाद यादव आधीच अनेक गंभीर आजारांशी झुंज देत आहेत. त्यामुळेच दुखापतीनंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावली. सध्या तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. चला जाणून घेऊया लालू प्रसाद यादव किती आजारांशी झुंज देत आहेत आणि आता त्यांची प्रकृती कशी आहे? पुढे काय होणार?

जाणून घ्या आधी कोणते आजार आहेत लालूंना ?
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. कौटुंबिक सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्थेने सांगितले की, त्यांच्या फुफ्फुसात पाणी भरले होते. याशिवाय खांद्याचे हाडही तुटले आहे. पडल्याने शरीराच्या इतर काही भागांना जखमा झाल्या आहेत.

याशिवाय लालू प्रसाद यादव यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, प्रोस्टेट वाढणे, युरिक ऍसिड वाढणे, किडनीचे आजार, थॅलेसेमिया (रक्तसंबंधित आजार), मेंदूशी संबंधित आजार, उजव्या खांद्याच्या हाडाचा त्रास, पायाचे हाड, डोळ्यांची समस्या, POST AVR (हृदयाशी संबंधित)यासारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. नुकताच RIMS रांचीच्या डॉक्टरांचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार आता लालू प्रसाद यादव यांची केवळ 25 टक्के किडनी काम करते.

आता परिस्थिती कशी आहे?
पाटण्यातील पारस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राजद प्रमुख सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, लालूजींची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या किडनी आणि हृदयाशी संबंधित आजारांवर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. तेथील डॉक्टरांना लालूजींचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास माहीत आहे.

तेजस्वी यांनी असेही सांगितले की लालूजींना रुग्णालयात दाखल केल्यापासून मुख्यमंत्री नितीश कुमार वारंवार त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशीही चर्चा झाली आहे. लालूजी लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

पुढे काय होणार?
लालू प्रसाद यादव सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमारही येथे पोहोचले. आता त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार केले जाणार आहेत. परिस्थिती सुधारली नाही तर दिल्लीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सिंगापूरला नेण्यात येईल, असे तेजस्वी यादव सांगतात.