ICC Test Ranking : विराट सहा वर्षांनंतर टॉप 10 मधून बाहेर, पंत पहिल्यांदाच दाखल, बेअरस्टोने कोहलीला टाकले मागे


नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत. विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत अव्वल 10 मधून बाहेर झाला आहे. त्याने चार स्थान गमावले असून तो 13व्या स्थानावर पोहोचला आहे. ऋषभ पंतने प्रथमच टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. यासोबतच दोन्ही डावात शतके झळकावणाऱ्या जॉनी बेअरस्टोनेही टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानावर कायम आहे.

विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत एकही शतक झळकावता आलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीतही त्याने 11 आणि 20 धावा केल्या होत्या. यामुळे त्याचे आयसीसी क्रमवारीत मोठे नुकसान झाले आहे. त्याचे आता 714 रेटिंग गुण आहेत आणि तो नवव्या स्थानावरून 13व्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने त्याला मागे टाकले आहे. या सामन्याच्या दोन्ही डावात बेअरस्टोने शतकी खेळी केली. त्याचा फायदा त्याला झाला, असून तो फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर आला आहे.

ऋषभ पंत पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये
एजबॅस्टन कसोटीत 141 धावांची शानदार खेळी करणाऱ्या पंतने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला असून फलंदाजांच्या क्रमवारीत तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे 801 रेटिंग गुण आहेत. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटनेही शानदार फलंदाजी केली आणि तो पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 923 रेटिंग गुण मिळवले आहेत.

गोलंदाजांमध्ये कमिन्स अव्वल
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 900 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. एजबॅस्टन येथे सहा विकेट घेणारा जेम्स अँडरसन एका स्थानाने सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्ध नऊ विकेट्स घेणाऱ्या नॅथन लायनला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो 13व्या स्थानावर पोहोचला आहे.

अष्टपैलूंच्या क्रमवारीतील पहिल्या दहामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने तीन स्थानांनी झेप घेत 14व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे.