DGCA Notice to Spicejet : स्पाइसजेटच्या विमानांमध्ये 18 दिवसांत आल्या 8 तांत्रिक अडचणी, डीजीसीएने बजावली कारणे दाखवा नोटीस


नवी दिल्ली: विमान वाहतूक कंपन्यांची नियामक संस्था DGCA (Directorate General of Civil Aviation) ने बुधवारी नागरी विमान वाहतूक सेवा प्रदाता स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या 18 दिवसांत कंपनीच्या विमानात आठ वेळा तांत्रिक दोष आढळून आल्याच्या अहवालानंतर डीजीसीएने ही कारवाई केली आहे.

डीजीसीएने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे, की या घटनांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की यातील बहुतांश घटना खराब अंतर्गत सुरक्षा निरीक्षण आणि अपुरी देखभाल यामुळे घडल्या आहेत. या घटना प्रणाली-संबंधित अपयशाची उदाहरणे आहेत आणि सुरक्षा मानकांमध्ये बिघाड झाल्यामुळे घडल्या आहेत.

DGCA ने स्पाईसजेटला या प्रकरणी उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. तत्पूर्वी DGCA ने स्पाईसजेट कंपनीबद्दल गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जारी केलेल्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये कंपनी कॅश आणि कॅरी मोडमध्ये काम करत असल्याचा खुलासा करण्यात आला होता. कंपनीचे पुरवठादार आणि विक्रेते यांना नियमित पैसे दिले जात नाहीत. यामुळे विमान कंपनीकडे स्पेअर्स आणि एमईएल (किमान इक्विपमेंट लिस्ट) सुद्धा कमी आहेत.

दुसरीकडे, डीजीसीएने जारी केलेल्या नोटीसवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट केले आहे की सुरक्षेत अडथळा आणणारी छोटीशी त्रुटी देखील सखोलपणे तपासली जाईल आणि दुरुस्त केली जाईल.