‘थॉर- लव्ह अँड थंडर’ बुकिंग मधेच तिकीट पोहोचले २ हजारावर

मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्स म्हणजे एमसीयु चा २९ वा चित्रपट ‘थॉर- लव्ह अँड थंडर’ गुरुवारी ७ जुलै रोजी प्रदर्शित होत असताना बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या अॅडव्हांस बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. काही ठिकाणी या चित्रपटाच्या तिकिटाचे दर २ हजार रुपयांवर गेले आहेत. भारतात हा चित्रपट डॉक्टर स्ट्रेंज इन ए मॅडनेस ऑफ मल्टीव्हर्स या चित्रपटाच्या यशाची पुनरावृत्ती करेल असे संकेत मिळत आहेत. या चित्रपटाने भारतात १५० कोटींचा व्यवसाय केला होता.

एमसीयुच्या चित्रपटांची लोकप्रियता भारतात २००८ पासून वाढती राहिली आहे. आयर्नमॅन पासून भारतीय चाहते या कंपनीच्या चित्रपटांच्या प्रेमात आहेत. आत्तापर्यंत एमसीयुचे २८ चित्रपट प्रदर्शित झाले असून ‘थॉर- लव्ह अँड थंडर’ हा २९ वा चित्रपट आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत या चित्रपटाने अॅडव्हांस बुकिंग मधून ९०० कोटींची कमाई केली असल्याचे समजते. भारतात इंग्लिश व्हर्जन साठी साडे सहा कोटी तर हिंदी व्हर्जन साठी २.२५ कोटींचे बुकिंग झाले आहे. याच कंपनीच्या अॅव्हेंजर्स एंडगेमने भारतात २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३७३.२२ कोटींची कमाई केली होती.

‘थॉर- लव्ह अँड थंडर’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १८५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १४६३ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. भारतात २८०० चित्रपट गृहात हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत असून त्याला २५ कोटींचे ओपनिंग मिळेल असा अंदाज वर्तविला गेला आहे.