ऋषी सुनक यांचा राजीनामा- बोरिस जोन्सन अडचणीत

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे दिल्याने पंतप्रधान बोरिस जोन्सन अडचणीत आल्याचे बोलले जात असतानाचा बोरिस यांनी नदीम जहावी यांची नवे अर्थमंत्री आणि स्टीव्ह बार्कले यांची नवे आरोग्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. या नेमणूकींना महाराणी एलीझाबेथ यांनी मंजुरी दिली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घडामोडींमुळे बोरिस यांच्यावर सुद्धा राजीमाना देण्यासाठी दबाव आणला जात असल्याची चर्चा जोरात आहे.

मंगळवारी ऋषी सुनक आणि साजिद जावेद यांनी आपली राजीमाना पत्रे सादर केली. आरोग्यमंत्री साजिद राजीनामा पत्रात म्हणाले,’ अनेक खासदार आणि जनता जोन्सन यांच्या देशहितासाठी सत्ता राबविण्याच्या क्षमतेवरचा विश्वास हरवून बसली आहे. तुमच्या नेतृत्वाने ही स्थिती बदलू शकणार नाही आणि म्हणून आमचा तुमच्यावर विश्वास नाही. ऋषी सुनक यांनीही ट्वीट करताना म्हटले आहे,’ जनतेची सरकारकडून अपेक्षा असते कि सरकार उचितप्रकारे, सक्षमतेने व गंभीरपणे चालविले जावे. हे घडले नसल्याने मी येथे काम करू शकत नाही.’ ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

दरम्यान पंतप्रधान जोन्सन यांनी मंगळवारी संसदेत एक डॉक्टर सदस्य सरकारमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्त करण्याचा निर्णय चुकीचा होता हे मान्य केले आहे. निलंबित खासदार क्रिस प्रींजर विरुद्ध अयोग्य वर्तनाची तक्रार होऊनही त्यांची डेप्युटी चीफ म्हणून बोरीस यांनी नियुक्ती केली होती आणि त्या विरोधात जोन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.