उद्धव ठाकरे पुन्हा पेचात? शिवसेना खासदार मुर्मू यांना मत देण्याच्या पक्षात

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नव्या पेचात सापडले आहेत. १८ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि शिवसेना खासदार भाजप आणि मित्र पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन करण्याची मागणी करू लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचा महत्वाचा चेहरा असलेले राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेऊन यशवंत सिन्हा यांची निवड केली असून त्यांचा प्रचार केला जात आहे.

महाराष्टाच्या विधानसभेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि त्यांना ४० आमदारांनी पाठींबा दिला आहे. आता शिवसेना खासदार पुन्हा शरद पवार यांच्या विरोधात जाऊन द्रौपदी  मुर्मू यांनाच उद्धव ठाकरे यांनी समर्थन द्यावे अशी मागणी करू लागले आहेत. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांना एक चिट्ठी लिहिली असल्याचे समजते.

मंगळवारी लिहिल्या गेलेल्या या चिठ्ठीत राहुल शेवाळे म्हणतात, सत्तारूढ राजगने निवडलेल्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला असून त्याचे समाजासाठीचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना समर्थन देण्याची परवानगी द्यावी. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका, मंत्रिपद आणि राज्यपाल म्हणून जबाबदारी पेलली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी २००७ मध्ये भाजप प्रणीत उमेदवाराला समर्थन न देता महाराष्ट्राची कन्या म्हणून प्रतिभाताई पाटील यांना समर्थन दिले होते. यावेळी मुर्मू यांना समर्थन दिले पाहिजे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुर्मू यांनाच समर्थन जाहीर केले आहे. आमदार आणि खासदार असे सर्व राष्ट्रपती निवडणुकीत मतदार असतात. शिवसेनेचे लोकसभेत १८ आणि राज्यसभेत ३ खासदार आहेत.