अग्निपथ- भारतीय हवाई दलाकडे साडे सात लाख अर्ज

देशात अग्निपथ योजनेतून सेना भरती साठी सुरु झालेल्या प्रक्रियेत भारतीय हवाई दलाकडे मंगळवार पर्यंत साडे सात लाख अर्ज आले असून ही नोंदणी प्रक्रिया २४ जून पासून सुरु झाली होती. १४ जून रोजी या भरती प्रक्रियेची घोषणा झाल्यावर देशभरात अनेक राज्यात विरोधी पक्षांनी या योजनेला विरोध केला आणि त्यातून अनेक ठिकाणी हिंसक प्रदर्शने झाली. विरोधकांनी सरकारने ही योजना मागे घ्यावी अशी मागणी लावून धरली होती.

हवाई दलाने ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार अग्निपथ भर्ती योजने खाली हवाई दलाने आयोजित केलेली ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. यापूर्वी ६,३१,५२८ अर्ज आले होते तर यावेळी ७,४९,८९९ अर्ज आले असून अर्ज येण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. या योजनेखाली १७ ते २१ वयोगटातील युवक चार वर्षासाठी सेने मध्ये भरती केले जाणार होते आणि चार वर्षानंतर त्यातील २५ टक्के युवकांना कायम सेवेत सामावून घेतले जाणार होते. अनेक राज्यात या योजनेला विरोध झाल्यावर सरकारने कमाल वयोमर्यादा २१ वरून २३ वर नेली होती.

भाजप शासित राज्यांनी यापूर्वीच चार वर्षांच्या सेना सेवेनंतर सैनिकांना राज्य पोलीस दलात प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र या योजनेच्या विरोधात ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना राज्य सरकार सेवेत घेणार नाही असे स्पष्ट केले गेले आहे.