Jharkhand Mob Lynching : झारखंडमध्ये जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची अमानुष हत्या


गढवा – झारखंडच्या गढवा जिल्ह्यात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला लोकांनी घरातून बाहेर काढून बेदम मारहाण करुन हत्या केली. गावातील लोकांचा दावा आहे की ती जादूटोणा करत असे.

गढवा पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, ही घटना चिनिया पोलीस स्टेशन हद्दीतील खुरी गावात घडली. एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पाच जणांनी तिला घरातून खेचून सुमारे 200 मीटर दूर नेले आणि काठ्यांनी मारहाण करुन हत्या केली, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे.

नातेवाईकांनी सांगितले की वृद्ध महिला हल्लेखोरांकडे दयेची भीक मागत राहिली, परंतु कोणाच्या हृदयाला पाझर फुटला नाही आणि ते मरेपर्यंत तिला लाठ्या मारत राहिले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वृद्ध महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. जादूटोण्याच्या संशयावरून हत्या झारखंडमधील एक मोठी सामाजिक दुष्टाई आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2001 ते 2020 दरम्यान एकूण 590 लोक जादूटोण्याच्या संशयावरून मरण पावले. यामध्ये बहुतांश महिला होत्या.

झाड तोडणे थांबवल्याच्या कारणावरून गुमला येथे मध्यमवयीन व्यक्तीला बेदम मारहाण
दुसरीकडे, राज्यातील गुमला जिल्ह्यातील भरनो पोलीस स्टेशन परिसरात एका मध्यमवयीन व्यक्तीची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 45 वर्षीय शमीम अन्सारी याने झाड तोडण्यास विरोध केला असता लोकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. अन्सारी लाकूड माफियांना रोखण्याचे काम करायचे.