राहुल गांधींना झारखंड उच्च न्यायालयाचा झटका, ‘सगळ्या चोरांचे नाव मोदीच का असते’ या विधानावरून अडचणीत


रांची – सगळ्या चोरांचे नाव मोदीच का असते या वक्तव्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावताना त्यांना रांचीच्या दिवाणी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस के द्विवेदी यांच्या न्यायालयाने सांगितले की, जे मुद्दे ते उच्च न्यायालयात मांडत आहेत, ते दिवाणी न्यायालयात मांडले जावेत. यापूर्वी उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.

वकील प्रदीप मोदी यांनी राहुल गांधींविरोधात रांची सिव्हिल न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रांचीमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, ज्यांच्या नावासमोर मोदी आहेत, ते सर्व चोरच का असतात. यामुळे मोदी समाज दुखावला गेला असून त्यांच्या सन्मानाला धक्का बसला आहे. राहुल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रांची आणि इतर काही सभांमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाला होते, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी… या सर्वांचे आडनाव मोदी कसे आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी असेच कसे?’ राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना त्यांनी ही टीका केली होती. राहुल गांधींवर इतर राज्यांतही गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी याच वक्तव्याप्रकरणी ते सुरतच्या दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते आणि त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता, कारण ते व्यंग्य करत होते. आता या भाषणाची फारशी आठवण येत नसल्याचेही सांगितले.