या बँकेत पैसे नाही तर जमा होते रामनाम

रामनगरी अयोध्या येथे गेली ५२ वर्षे एक आंतरराष्ट्रीय बँक चालविली जात असून या बँकेचे नाव आहे श्री सीताराम बँक. या बँकेत खातेदार पैसे जमा करू शकत नाही तर येथे रामनाम जप जमा केला जातो. येथे रामनामाचा हिशोब ठेवला जातो आणि या बँकेच्या ग्राहकाला बँकेप्रमाणे पासबुक सुद्धा दिले जाते. १९७० पासून ही बँक सुरु आहे आणि आज घडीला येथे १५.५० हजार कोटी नाम संख्या जमा झाली आहे.

विशेष म्हणजे या बँकेत खाते उघडणारे भाविक विविध भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषेत सुद्धा रामनाम लिहून ते जमा करू शकतात. ज्यांनी सीताराम जपात किमान ५ लाख वेळा नाम लिहिले आहे त्यांना येथे खाते उघडता येते. अनेक श्रद्धाळू मोहरी, तांदूळ, हरबरे या धान्यांनी सुद्धा रामनाम लिहून येथे जमा करतात. ज्याच्या खात्यात २५ ते ५० लाख वेळा रामनाम लिहिल्याची नोंद होते त्यांना खास प्रमाणपत्र दिले जाते.

या बँकेचे मॅनेजर पुनीत दास म्हणाले, कार्तिक कृष्ण एकादशी १९७० मध्ये महंत नृत्यगोपाल दास यांनी या बँकेचे उद्घाटन केले. पूर्वी रामनाम लिहिण्यासाठी कॉपी दिल्या जात आणि त्यावर जप लिहून द्यायचा असे. येथे रोज भाविक खातेदारांची संख्या वाढती असून आता आम्ही गिनीज बुक मध्ये नाव नोंदविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.