बाळासाहेबांच्या सन्मानार्थ आदित्य ठाकरे यांची आमदारकी रहाणार कायम

शिवसेनेने जारी केलेला व्हीप न जुमानता बहुमत सिध्द करताना विरोधी मतदान केलेल्या ज्या आमदारांचे सदस्यत्व रद्द केले जाणार आहे त्यात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव नाही. महाराष्ट्र विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केल्यावर शिवसेनेचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्या कडे व्हीप मोडून सरकार विरोधात मतदान केलेल्या १५ शिवसेना आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे मात्र त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव सामील नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

भरत गोगावले यांनी या संदर्भात खुलासा केला असून जाणूनबुजून आदित्य ठाकरे याचे नाव वगळले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिवसेना प्रमुख आणि आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान राखण्यासाठीच आदित्य यांचे नाव या यादीतून काढून टाकले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे सोडून बाकी सर्व आमदारांना अपात्र ठरविणारी नोटीस जारी केली गेली आहे. शिंदे गटाकडे २/३ बहुमत आहे त्यामुळे हीच खरी शिवसेना आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी अगोदरच केला आहे. विशेष म्हणजे सोमवारी आणखी एक आमदार शिंदे गटात सामील झाला असून विधानसभेच्या एकूण  ५५ शिवसेना आमदारांपैकी ४० शिंदे गटात आले आहेत.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर शिवसेनेने केलेली युती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या मताचा अनादर होता अशीच आमची भावना असल्याचे गोगावले यावेळी बोलताना म्हणाले.