मलेशिया खरेदी करणार भारतीय तेजस लढाऊ विमाने
मलेशियाने त्यांच्या हवाई दलासाठी भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटीक्स ने बनविलेली तेजस लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. हे वृत्त येताच कंपनीच्या शेअरने एकदम उसळी घेऊन सोमवारी इंट्राडेवर ३.५ टक्क्याची वाढ नोंदविली. सोमवारी हा शेअर १८०५ रुपयांवर पोहोचला.
हिंदुस्थान एरोनॉटीक्सचे अध्यक्ष माधवन यांनी मलेशिया भारताकडून तेजस जेट खरेदी करणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले हे सुपरसोनिक विमान विषम हवामानात उड्डाण करण्यास सक्षम आहे. गेल्या फेब्रुवारी मध्ये भारताच्या रक्षा मंत्रालयाने ८३ विमान खरेदीसाठी ४८ हजार कोटींचा करार केला आहे. तेजस एमके २ ही पाचव्या पिढीची अत्याधुनिक विमाने विकसित करण्यासाठी ५ अब्ज अमेरिकी डॉलर खर्चाच्या योजनेवर काम सुरु आहे.
मलेशियाला त्यांच्या हवाई दलातील जुन्या विमानांचा ताफा बदलायचा आहे. त्यासाठी चीनी जेएफ १७ जेट, द. कोरियाची एफए ५० आणि रशियन मिग ३५ यांच्या बरोबर तेजस ला स्पर्धा करावी लागली त्यात तेजसने बाजी मारली आहे. तेजस खरेदीची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. चीन ने स्वस्तात विमाने देण्याची तयारी दाखविली होती पण भारताने मलेशियाला अधिक चांगली ऑफर दिली आहे. या पॅकेज मध्ये विमानांची देखभाल,दुरुस्ती आणि ओवरऑल सुविधा दिली गेली आहे. त्यात मलेशियाला सुखोई ३० विमानाची देखभाल, सुटे भाग यांचाही पुरवठा भारत करणार आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे रशियावर लादल्या गेलेल्या प्रतीबंधांमुळे सुखोई ३० सुटे भाग मिळविण्यात मलेशियाला अडचणी येत आहेत असे समजते.