पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गर्दुले असल्याचे आरोप
सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नवीन शाहबाज सरकारवर सातत्याने काही ना काही आरोप करत आहेत. आणि सरकार सुद्धा इम्रान खान यांच्या विरोधात आरोप करत आहे. पंजाब प्रांताचे गृहमंत्री अता तराड यांनी तर इम्रान खान ड्रग अॅडीक्ट असल्याचा आरोप केला असून दोन तास सुद्धा ते कोकेनशिवाय राहू शकत नाहीत असे म्हटले आहे. इम्रान खान याच्या शेकडो एकरात पसरलेल्या अलिशान बनिगाला घरात कोण ड्रग पोहोचवतो याची सर्व माहिती सरकारकडे आहे असे त्यांनी सांगितले.
इम्रान खान यांच्यावर गर्दुले असल्याचा हा पहिलाच आरोप नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा त्यांच्यावर ड्रग सेवनाचे आरोप झाले आहेत. २०२० मध्ये त्यांचा जवळचा मित्र आणि एके काळाचा क्रिकेटमधील सह खेळाडू सर्फराज नवाझ याने खुलेआम टीव्ही शो मध्ये असेच आरोप इम्रान खान यांच्यावर केले होते. इम्रान खान यांची घटस्फोटीत पत्नी रेहम खान यांनीही इम्रान खान नशेच्या आहारी गेले असल्याचा आरोप वारंवार केला होता.
लाहोर येथे पत्रकार परिषदेत बोलताना पंजाबचे गृहमंत्री तराड यांनी ड्रग प्रकरणी इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते पण आम्ही त्यांना अटक करणार नाही असे सांगीतले. तुरुंगात ते नशा न करता राहू शकणार नाहीत म्हणून त्यांना अटक केली जाणार नाही असे ते म्हणाले. क्रिकेट खेळत होते तेव्हा सुद्धा इम्रान खान चरस घेत असत असेही तराड यांनी सांगितले.