निवडणूक आयोगापुढे पेच- मृत व्यक्तीने जिंकली निवडणूक
मध्यप्रदेशातील सागर जिल्यात पंचायत निवडणूकीत एक अजब प्रकार घडला असून त्यामुळे निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण झाला आहे. सागर जिल्यात देवरी तहसील मधील कजेरा गावात सरपंच निवडणूक पार पडली आणि निकाल देणारे अधिकारी संभ्रमात पडले. याचे कारण म्हणजे ही निवडणूक एका मृत व्यक्तीने जिंकली. मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र ठाकूर यांनी ही निवडणूक जिंकली पण निवडणुकीचे मतदान होण्याच्या अगोदरच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.
या गावात १ जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी झाली. त्यापूर्वी २२ जून रोजी रवींद्र ठाकूर यांचा मृत्यू झाला होता मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना दिलीच नाही. त्यामुळे त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहिले. एखादी उमेदवार व्यक्ती अचानक मृत झाली तर मतदानाच्या ७२ तास अगोदर पर्यंत नाव कमी करून नवीन मतपत्रिका देता येतात. मात्र ठाकूर यांच्या संदर्भात काहीच कळविले न गेल्याने त्यांच्या नावासह मतपत्रिका दिल्या गेल्या आणि मतदान होऊन त्यांना मते मिळाली.
जिल्हा निवडणूक अधिकारी दीपक आर्य म्हणाले, जेव्हा मतमोजणी झाली आणि रवींद्र ठाकूर सर्वाधिक मते मिळवून निवडून आले असल्याचे स्पष्ट झाले पण ठाकूर यांचे निधन झाल्याचे नंतर समजल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा केली गेली आहे. निवडणुकीचा निकाल १८ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. या गावात एकूण १२९६ मतदारांपैकी १०४३ मतदारांनी मतदान केले आणि ठाकूर यांना ५१२ मते मिळाली. त्याचे प्रतीस्पर्धी चंद्रभान अहिरवार यांना २५७ मते मिळाली आहेत. म्हणजे ठाकूर यांना २५५ मते जास्त मिळाली आहेत.