Lalu Yadav Admit : RJD प्रमुख लालू यादव यांची प्रकृती बिघडली, पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल


पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना आज पहाटे 4 वाजता पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी तोल गेल्याने ते पाटण्यातील राहत्या घरी कोसळले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती.

पडल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या खांद्याच्या हाडात किरकोळ फ्रॅक्चर झाले आहे. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री लालू यादव यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. लालू यादव यांना त्यांचा धाकटा मुलगा आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी स्वतः रुग्णालयात आणले होते.

आरजेडी सुप्रीमो रविवारी संध्याकाळी त्यांच्या घरातील पायऱ्यांवरून खाली पडले होते. त्यामुळे त्यांच्या खांद्याचे हाड मोडले. त्यांना आधीच अनेक आजार आहेत. यादव यांना किडनीचाही गंभीर त्रास आहे. ते सध्या पत्नी राबडी देवी यांना दिलेल्या शासकीय निवासस्थानी राहतात. माजी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे त्यांची दोन्ही मुले तेजस्वी आणि तेज प्रताप यादव हे देखील या दिवसात तेथे राहतात.

लालू यादव यांची प्रकृती खालावल्याने राजद कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राबडी देवी यांचे निवासस्थान आणि पारस रुग्णालयात पोहोचून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.