IND vs ENG : ऋषभ पंतने मोडला 72 वर्ष जुना विक्रम, धोनी आणि मांजरेकरला टाकले मागे, जाणून घ्या


एजबॅस्टन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने शतक झळकावून अनेक विक्रम केले. आता दुसऱ्या डावातही तो 57 धावांवर बाद झाला. या खेळीसह त्याने 72 वर्षे जुना विक्रम मोडला. पंत इंग्लंडमधील कसोटीत दोन्ही डावात जास्त धावा करणारा विरोधी संघाचा (इंग्लंडसोडून इतर देश) यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे.

पंतने आतापर्यंत एजबॅस्टन कसोटीत दोन्ही डाव एकत्र करून 203 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या डावात 146 धावा केल्या होत्या. याआधी वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज क्लाईड वॉलकॉटच्या नावावर इंग्लंडमध्ये कसोटीच्या दोन्ही डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. वॉलकॉटने 1950 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध 182 धावा केल्या होत्या.

त्यानंतर वॉलकॉटने पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात नाबाद 168 धावा केल्या. पंतने आता वॉलकॉटला मागे टाकले आहे. याशिवाय पंत आशियाबाहेर एकाच कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम यष्टिरक्षक फलंदाज विजय मांजरेकरच्या नावावर होता. 1953 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या किंग्स्टन कसोटीत त्याने 161 धावा (दोन्ही डाव) केल्या.

विजय मांजरेकर यांचा हा विक्रम तब्बल 69 वर्षांनंतर मोडला गेला आहे. याशिवाय पंतने धोनीचा 11 वर्षे जुना विक्रमही मोडला. धोनीने इंग्लंडमध्ये एका कसोटीत सर्वाधिक 151 धावा केल्या होत्या. त्याने 2011 मध्ये बर्मिंगहॅम येथे पहिल्या डावात 77 आणि दुसऱ्या डावात 74 धावा केल्या होत्या. दोन्ही डाव एकत्र करून कोणत्याही एका कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विचार केला, तर हा विक्रम झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरच्या नावावर आहे. फ्लॉवरने 2001 मध्ये एकूण 341 धावा केल्या ज्यात पहिल्या डावातील 142 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 199 धावा केल्या होत्या.

पंतने दुसऱ्या डावात कसोटी कारकिर्दीतील 10 वे अर्धशतक झळकावले. कसोटीच्या एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला. याआधी, फारुख इंजिनियर यांनी 1973 मध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 121 धावा आणि दुसऱ्या डावात 66 धावा केल्या होत्या.

फरक एवढाच की फारुख यांनी ही खेळी भारतीय भूमीवर खेळली, तर पंतने परदेशी भूमीवर खेळली. इंग्लिश भूमीवर अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा यष्टिरक्षक फलंदाज आहे. मॅट प्रायरने 2011 मध्ये लॉर्ड्सवर पहिल्या डावात 71 आणि दुसऱ्या डावात नाबाद 103 धावा केल्या होत्या.

एजबॅस्टन कसोटीत भारताने दुसऱ्या डावात 190 हून अधिक धावा केल्या आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 284 धावांत गारद झाला. अशा प्रकारे भारताने दुसऱ्या डावात 132 धावांची आघाडी घेतली होती.