मोबाईल शोधल्याचा जनक मार्टिन यांना होतोय पश्चाताप

सेलफोनचा जनक म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या मार्टिन कुपर यांनी मोबाईलचा शोध लावल्याचे आपल्याला दुःख होत आहे अशी भावना व्यक्त केली आहे. याचे कारण म्हणजे गरजेपेक्षा खूपच अधिक प्रमाणात मोबाईलचा केला जात असलेला वापर. मार्टिन यांनी जगभरातील मोबाईल युजर्सना ‘ मोबाईल मध्ये वेळ घालवू नका, त्यापेक्षा खरे आयुष्य जगा’ असा कळकळीचा सल्ला दिला आहे. ९३ वर्षीय मार्टिन यांनी लोकांनी आता त्याच्या आयुष्यातील प्राथमिकता ठरवायला हव्यात असेही मत व्यक्त केले आहे.

१९७० च्या दशकात पहिला मोबाईल बनविणाऱ्या मोटोरोल टीमचे मार्टिन निरीक्षक होते. १९७३ मध्ये सार्वजनिक स्वरुपात पोर्टेबल मोबाईलचा वापर करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी दिवसातील फक्त ५ टक्के वेळ मोबाईलवर घालवतो असे स्पष्ट केले होते. मात्र आजघडीला चीन खालोखाल भारतीय युजर्स जगात सर्वाधिक अॅप्स डाऊनलोड करत आहेत आणि करोना काळात मोबाईलचे व्यसन अधिक वाढले आहे असे सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.

भारतीयांचा विचार करायचा तर गेल्या वर्षात भारतीयांनी ६९.९ कोटी तास मोबाईल पाहण्यावर घालविले आहेत. अन्य देशाच्या तुलनेत भारतात इंटरनेट स्वस्त असल्याचे कारण त्यामागे दिले जात आहे. संवाद, मनोरंजन, आर्थिक देवघेवी, यासाठी मोबाईल लोकप्रिय ठरले आहेत. भारतीय व्यक्ती दररोज सरासरी ४.७ तास मोबाईलवर घालवितात.

जगभराचा विचार करायचा तर किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढत चालले आहे. तर अन्य लोकांमध्ये अनेक वाईट लक्षणे समोर येत आहेत. उदाहरणार्थ ८७.८ टक्के युजर्स मोबाईल घरी राहिला तर घाबरे होतात, ७३.४ टक्के युजर्स टॉयलेट मध्ये सुद्धा मोबाईल नेतात. ६९ टक्के युजर्स रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदरपर्यंत मोबाईल चेक करत राहतात, ९६ टक्के युजर्स फोन जवळ घेऊन झोपतात. तर ४३.५ टक्के युजर्स दिवसात किमान ५० ते १०० वेळा फोन अनलॉक करतात. २१ टक्के किशोर मोबाईल मुळे दुर्घटनेची शिकार बनत आहेत तर १७.३ टक्के पालक आपल्या मुलांपेक्षा अधिक वेळ मोबाईलसाठी देतात असे दिसून आले आहे.