जगातील अनेक देशांना रोटी खाऊ घालतोय भारत

भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (डीजीएफटी)ने १३ मे रोजी भारतातून गहू निर्यातीवर बंदी घातली असली तरी जगातील गरजू देशांना भारतातून गहू पुरविला जात आहे. जगातील अनेक देशांना भारत रोटी खाऊ घालत असून त्यात किमान १० देशांचा समावेश आहे. निर्यात बंदी लागू झाल्यावर सुद्धा १६ लाख टन गहू निर्यात केला जात असल्याचे समजते. निर्यात बंदी लागू होण्यापूर्वी ज्या निर्यातदारांनी गहू निर्यात नोंदणी करून प्रमाणपत्र घेतली आहेत ते गहू निर्यात करू शकणार आहेत असे या विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगातील बाजारात गव्हाच्या किमती भडकल्या आहेत. हे दोन्ही देश गव्हाचे मोठे उत्पादक असून जगात गहू पुरविण्यात त्यांचा हिस्सा २५ टक्के आहे. रशियाने तुर्की मार्गे गहू निर्यात सुरू ठेवली आहे आणि यामुळे गव्हाच्या किमती स्थिर होतील अशी अपेक्षा आहे. २०२०-२१ मध्ये भारताने २.०५ अब्ज डॉलर्स किमतीचा गहू निर्यात केला असून भारतीय निर्यातीतील बांग्लादेश, नेपाळ, युएई, श्रीलंका, यमन, अफगाणिस्थान, कतार, इंडोनेशिया, ओमान आणि मलेशिया हे प्रमुख १० देश आहेत. भारत जगात दोन नंबरचा गहू उत्पादक देश आहे मात्र निर्यातीत भारताचा वाटा १ टक्का इतकाच आहे. दरवर्षी सरासरी १०.७५ कोटी टन गव्हाचे भारतात उत्पादन होते असे समजते.